होमपेज › Pune › डास मारण्यासाठी पालिकेचे मशिन

डास मारण्यासाठी पालिकेचे मशिन

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:14AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यास स्वच्छता आणि नदीपात्रातील जलपर्णी जबाबदार आहे. जलपर्णी काढली जात नसल्याने पालिका प्रशासनावर नेहमीच आरोप होत आहेत. आता डासांवर मात करण्यासाठी पालिका मॉस्किटो किलींग मशिन खरेदी केले आहेत. त्याद्वारे शहरातील डासांचा नायनाट करण्याचा चंग पालिकेने बांधला आहे. 

साचलेला कचर्याचे ढीग, तुडूंब भरलेली कचरा कुंडी वेळेवर उचलली जात नसल्याने परिसरात पसरलेला कचरा, त्यावर ताव मारणारे मोकाट डुकरे, कुत्री व जनावरे आणि साचलेले पाणी हे दृश्य शहरातील अनेक भागांत पाहावयास मिळत आहे. तसेच, शहरातून वाहणार्या पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्र व्यापलेली हिरव्या रंगाची जलपर्णी दिसते. तर, काही भागांत नदीच्या पाण्याला फेस येऊन दुर्गंधी सुटली आहे. तसेच, नियमितपणे नाले व गटार स्वच्छ केले जात नाहीत. परिणामी, शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पालिकेच्या आरोग्या विभागाकडून स्वच्छता आणि नदीतील जलपर्णी काढण्याची कारवाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, डासांचे प्रमाण काही कमी होत नाही. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांमध्ये संताप आहे. पावसाळ्यात डासांचा त्रास कमी होईल, अशी नागरिकांना आशा होती.

मात्र, अजूनही डासांचा त्रास कायम आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने चक्क डास मारण्याचे मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लाख 15 हजार रूपये किंमतीचे एक हे मशिन आहे. एकूण 4 मशिन खरेदी करण्यात येणार आहे. त्याची एकूण रक्कम 8 लाख 60 हजार आहे. सदर मशिनची एका वर्षांसाठी दुरूस्ती व देखभाल इंद्रनिल टेक्नोलॉजिस करणार आहे. या मशिनमुळे डास कितीपत मरतील, प्रश्न आहे. 

फाँगिग मशिनच्या धुरीकरणावर लाखो रुपये खर्च

शहरातील डास कमी होण्यासाठी पालिकेच्या वतीने सायंकाळच्या वेळी फाँगिंग मशिनद्वारे औष्णिक धुरीकरण केले जाते. त्यासाठी पालिकेने क्षेत्रीय कार्यालयाद्वारे फाँगिंग मशिन व तीन चाकी टेम्पो भांड्याने घेतले आहेत. टेम्पो, चालक व इंधन, रासायनिक साहित्यावर खर्च होतो. एका क्षेत्रीय कार्यालयासाठी किमान 5 ते 6 टेम्पो व मशिन आहेत. असे एकूण 40 ते 45 मशिन व टेम्पो आहेत. त्यावर दर महिन्यास लाखो रूपये खर्च केला जात आहे. मात्र, डासांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. उलट, अनेक भागांत नियमितपणे धुरीकरण केले जात नसल्याचा असंख्य तक्रारी आहेत.