Sun, Jul 21, 2019 07:57होमपेज › Pune › ‘आधार’जोडणीसाठी धान्य दुकानांमध्ये यंत्र

‘आधार’जोडणीसाठी धान्य दुकानांमध्ये यंत्र

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:44PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये यापुढे ई-ए-पीडीएस सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. यामुळे शिधापत्रिकांना ‘आधार’जोडणी करणे सोपे होणार आहे; तसेच कोणत्याही जिल्ह्यातील लाभार्थी राज्यात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानामधून धान्य घेऊ शकेल.  

शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही यंत्रे मुख्य कार्यालयाशी; तसेच इतर पुरवठा विभागाच्या कार्यालयांशी ऑनलाईन पद्धतीने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे किती लाभार्थींनी धान्य घेतले, स्वस्त धान्य दुकानदारांकडे किती धान्य शिल्लक आहे, याची सर्व माहिती पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना समजते. या यंत्रामध्ये अंगठ्याचा ठसा दिल्याशिवाय लाभार्थींना धान्य मिळत नाही.

त्यामुळे धान्य वाटपातील काळाबाजार थांबणार  आहे. पुरवठा विभागाने शिधापत्रिकांना आधार कार्डची जोडणी करून घेण्याचे आवाहन नागरिकांना; तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना केले होते; मात्र त्याच परिणाम दिसून येत नाही. सध्या सरासरी 80 ते 85 टक्के लाभार्थींनी शिधापत्रिकेशी ‘आधार’जोडणी करून घेतली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे आधार जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने धान्य पुरवठा करताना अडचणी येत आहेत. 

यामुळेच आधार जोडणी न करणार्‍या लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानामध्येच आधार जोडणी करून देण्याची सुविधा देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यासाठी सध्याच्या ई-पॉस यंत्रालाच ई-ए-पीडीएस सॉफ्टवेअर जोडून देण्यात येणार आहे. आधार कार्डची शिधापत्रिकेला जोडणी नसेल, तर या यंत्राद्वारे लगेच आधार जोडणी करून घेता येणार आहे. 

स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थीचे नाव फक्त त्या यंत्रामध्ये टाकले पाहिजे. आधार कार्डचा बारा अंकी क्रमांक सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यास आधारची जोडणी एका दिवसात पूर्ण होते.