Wed, Mar 27, 2019 00:28होमपेज › Pune › महावितरणला पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची गरज 

महावितरणला पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची गरज 

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:08AMपुणे : शिवाजी शिंदे 

महावितरणच्या पुणे परिमंडलातील मुख्य अभियंता या पदाचा कार्यकाळ तीन वर्षाचा आहे. मागील तेरा वर्षात सुमारे सात अधिकार्‍यांनी या पदावर काम केले. त्यातील केवळ दोनच अधिकार्‍यांनी या पदाचा कार्यकाल पूर्ण केला असल्याचे वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे या पदावर मागील काही वर्षापासून निवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे परिमंडलातील महत्वाची विकास कामे होण्यास ‘खो’ बसत असल्याचे दिसून आले आहे.

महावितरण वीज कंपनीच्या पुणे परिमंडलात (शहर आणि ग्रामीण भाग मिळून) सुमारे सत्तावीस लाख वीजग्राहक (घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक) असून, महसूल 900 कोटी रूपयांच्या आसपास आहे. राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे परिमंडल म्हणून या पुणे विभागाचा नावलौकिक आहे. प्रशासकीय कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे दहा वर्षापूर्वी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यामध्ये विभाजन करण्यात आले. परिणामी सर्व कंपन्याचा कारभार वेगवेगळा झाला. यासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या देखील त्यानुसार करण्यात आल्या आहेत. या शिवाय परिमंडलामध्ये अतिशय महत्वाच्या असलेल्या मुख्य अभियंत्याच्या नियुक्त्या देखील संबधीत व्यवस्थापकीय संचालकांच्या माध्यमातून करण्यात आल्या. 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंड्ळाचे विभाजन होण्यापूर्वी पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाची धुरा आर.बी. गौतम यांच्याकडे होती. गौतम यांनी नियमानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. त्यानंतर सन 2008 रोजी मुख्य अभियंता म्हणून एस.पी.नागटिळक यांची नियुक्ती झाली. नागटिळक यांनी 2013 पर्यंत म्हणजेच सुमारे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मागील तेरा वर्षाचा विचार करता केवळ नागटिळक यांनीच सर्व मुख्य अभियंत्यापेक्षा जास्त काळ या पदावर काम केले. मात्र नागटिळक याच्यानंतर सुमारे पाच अधिकार्‍यांनी मुख्य अभियंता या पदाची धुरा सांभाळली आहे. मात्र त्यापैकी एकाही अभियंत्याने या पदाचा तीन वर्षाचा असलेला कार्यकाळ पूर्ण केला नाही. काही अधिकारी तर केवळ दोन महिन्यांपासून ते दीड वर्षाचा कार्यकालळ पूर्ण करून निवृत्त झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक महसूल  देणार्‍या परिमंडलास आता खर्‍या अर्थाने तीन वर्ष कार्यकाल पूर्ण करणारा मुख्य अभियंता मिळणे अतिशय गरजेचे आहे. सध्याचे मुख्य अभियंता हेही मेअखेरीस निवृत होत आहेत.