Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Pune › शासकीय नोकरीसाठी एमएससीआयटीची अट रद्द 

शासकीय नोकरीसाठी एमएससीआयटीची अट रद्द 

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:35AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

इंजिनीअरिंगची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी एमएससीआयटी परीक्षा हा अडथळा ठरणार नाही. त्यामुळे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही केवळ एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण नाही, म्हणून शासकीय नोकरी गमविण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही. शासकीय सेवेत नव्याने दाखल होणार्‍या उमेदवारांच्या दीर्घ काळापासून प्रलंबित मागणीला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता एमएससीआयटीशीवाय देखील संगणक साक्षर समजले जाणार आहे.

राज्य सरकारने काढलेल्या आध्यादेशानुसार, आता  इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत कायम होण्यासाठी दोन वर्षांच्या आत एमएस-सीआयटीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान किंवा त्यासंबंधीचे विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही या अटीतून सूट देण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (आयसीएससी) आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेत दहावी-बारावीला माहिती तंत्रज्ञान (आयटी) किंवा संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील एमएससीआयटी करायची आवश्यकता राहणार नाही.

राज्य सरकारने 2003 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, उमेदवारांना शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून दोन वर्षांत ‘एमएस-सीआयटी’ ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यातून कोणालाही सूट देण्यात आलेली नव्हती. परंतु शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे एकीकडे काही उमेदवारांना दिलासा मिळालेला असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांना फक्त एमएससीआयटी करण्यासाठी खासगी संगणक केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच केवळ एमएससीआयटीच्या नावाखाली संगणक प्रशिक्षणाचे दुकान थाटणार्‍यांना चांगलाच चाप लागणार आहे.