Fri, Feb 22, 2019 12:34होमपेज › Pune › कृषी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; ६ हजार १६० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र

कृषी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; ६ हजार १६० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र

Published On: Jul 21 2018 7:21PM | Last Updated: Jul 21 2018 7:21PMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  ‘कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा- गट ब’ या पदासाठी २० मे २०१८ रोजी घेण्यात आलेल्या कृषी सेवा पूर्व परीक्षा - २०१८ चा निकाल शनिवारी (दि. २१ जुलै ) जाहीर करण्यात आला. पूर्व परीक्षेतून कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी ६ हजार १६० उमेदवार पात्र ठरल्याचे आयोजाने प्रसिध्द केले. सर्वसाधारण गटातून पुरुष उमेदवारांसाठी ५४ तर महिला उमेदवारांचा २८ एवढे गुण मिळविणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.


एमपीएससीद्वारे कृषी सेवा पूर्व परिक्षा २० मे रोजी राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या चार जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व या परीक्षेचा कटऑफही आयोगाने शनिवारी (दि. २१ जुलै ) संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. आयोगाद्वारे एकूण ७० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेसाठी एकूण ६ हजार १६० उमेदवार पात्र ठरल्याचे आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पुणे केंद्रातून परीक्षा दिलेल्या सर्वाधिक ३ हजार ३९८ उमेदवारांचा समावेश आहे. त्याखालोखाल औरंगाबाद केंद्रावरील १ हजार ७९९ उमेदवार, नागपूर केंद्रावरील ७१७, मुंबई केंद्रावरील २४६ उमेदवारांचा समावेश आहे.


या परीक्षेचा कटऑफ खुल्या वर्गातील पुरुष उमेदवारांसाठी ५४, महिला गटांसाठी २८ इतका आहे. अनुसूचित जाती गटाचा कटऑफ पुरुषांसाठी ५०, तर महिला गटांसाठी ५०, अनुसूचित जमाती संवर्गाचा पुरुषांसाठी ३६, तर महिला गटांसाठी ३६ इतका आहे. इतर मागास वर्ग गटाचाही ५४ इतका कटऑफ असल्याचे आयोगाने कळविले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्क असून मुख्य परीक्षा ८ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.