होमपेज › Pune › स्पर्धा परीक्षार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार

स्पर्धा परीक्षार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये सरळसेवा भरती आणि पदोन्नतीच्या जास्तीत जास्त रिक्त जागा भराव्यात, या मागणीसाठी पुणे शहरात एमपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या परीक्षार्थींनी गुरुवारी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढत अभूतपूर्व एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देत मूक आक्रोश नोंदवला. शासनाच्या विविध विभागांमध्ये तब्बल 1 लाख 77 हजार 259 जागा रिक्त असल्याचा प्रकार दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी राज्यभर मोर्चे काढत आहेत. 

ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर सकाळी 9 वाजल्यापासूनच स्पर्धा परीक्षर्थींनी गर्दी करण्यास सुरुवात केली. विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन त्यांनी शनिवारवाड्यासमोरील मैदानात गर्दी  केली होती. कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर न घेता, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ही सळसळती तरुणाई गोळा झाली होती.सकाळी 10.15 वाजता पाच ते सहा हजार विद्यार्थी शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. 11 वाजता मोर्चात पुढे असणार्‍या विद्यार्थिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचल्या. त्यानंतर उर्वरित विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावरच आंदोलकांनी ठाण मांडले. त्यामुळे नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा रस्ता तब्बल दीड तास वाहतुकीसाठी बंद करावा लागला. यावेळी केवळ विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धा परीक्षार्थींनी शिष्टमंडळामार्फत निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्या 

1 लाख 70 हजार रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत. तसेच केंद्र सरकारच्या 4 लाख 20 हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात.  राज्यसेवेच्या 69 पदांमध्ये वाढ करावी.  प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावावी.  स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमीसारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा. बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी. आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे. परीक्षा केंद्रावरती मोबाईल जामरसारखी यंत्रणा बसवावी. स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस  आणणारे योगेश जाधव यांच्या सुरक्षेत वाढ करावी. परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था सुसज्ज असावी. परीक्षेसाठीची प्रवेश फी माफक असावी, जेणेकरून सामान्य विद्यार्थ्यांना भुर्दंड बसणार नाही. खासगी तत्त्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरावीत. संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी, आदी मागण्यांचा निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.