Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Pune › ‘भावी अधिकार्‍यांचा आज पुण्यात एल्गार’

‘भावी अधिकार्‍यांचा आज पुण्यात एल्गार’

Published On: Feb 07 2018 10:53PM | Last Updated: Feb 07 2018 11:02PMपुणे : प्रतिनिधी 

शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये सरळसेवा भरती आणि पदोन्नतीच्या तब्बल 1 लाख 77 हजार 259 जागा रिक्त असल्याचा प्रकार दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत. पुणे शहरातदेखील  गुरुवार दि.8 रोजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणारे भावी अधिकारी एल्गार पुकारणार असून, जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन समस्यांकडे लक्ष वेधणार आहेत. बुधवारी मोर्चाचे नियोजन करण्यासाठी 300 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन मोर्चाची तयारी केली असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मोर्चा समन्वय समितीमार्फत देण्यात आली आहे.
राज्याच्या कानाकोपर्‍यातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलेले हजारो विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी होणार असून, हा मूक मोर्चा असणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ न करता केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे तरुण एकत्र येऊन हा मूकमोर्चा काढणार आहेत. शनिवारवाड्यापासून सकाळी 9.30 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार असून जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

मोर्चाच्या माध्यमातून 1 लाख 70 हजार रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी. तसेच केंद्र सरकारच्या 4 लाख 20 हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात,  राज्यसेवेच्या 69 पदांमध्ये वाढ करण्यात यावी, प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी,  स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमीसारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा, बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी, आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे, परीक्षा केंद्रावरती मोबाईल जामरसारखी यंत्रणा बसवावी, स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस  आणणारे योगेश जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी, परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था ही सुसज्ज असावी, परीक्षेसाठीची प्रवेश फी ही माफक असावी, जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. खासगी तत्त्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी, संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी, स्पर्धा परीक्षांसाठी तामिळनाडू पॅटर्न राबवावा, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या करण्यात येणार असल्याचे देखील स्पर्धा परीक्षा देणार्‍या भावी अधिकार्‍यांनी सांगितले.