Fri, Jul 19, 2019 23:04होमपेज › Pune › ‘एमपीएससी’च्या प्रवेश प्रक्रियेवरील स्थगिती कायम

‘एमपीएससी’च्या प्रवेश प्रक्रियेवरील स्थगिती कायम

Published On: Feb 10 2018 1:54AM | Last Updated: Feb 10 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला मुंबई हायकोर्टाने दिलेली स्थगिती गुरुवारी कायम ठेवली आहे. मागासवर्गीय उमेदवाराला गुणवत्तेच्या आधारे खुल्या वर्गातील जागेसाठी अर्ज करण्याचा अधिकार असतानाही त्याकडे कानाडोळा करून, त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आयोगाच्या (एमपीएससी) सर्वच प्रवेश प्रक्रियांना स्थगिती दिली होती. या याचिकेवर अतिंम सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

एमपीएससीद्वारे घेण्यात येणार्‍या स्पर्धा परिक्षांमध्ये मागासवर्गातील उमेदवारांनी गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागेसाठी अर्ज केला, तर त्यांना मुलाखतींमध्ये अपात्र  ठरविण्यात आले होते. त्याविरोधात उमेदवारांनी कोर्टात जात आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. एमपीएससीद्वारे मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या वर्गातील जागांसाठी अर्ज करता येणार नसल्याची नोंद ऑनलाइन अर्जात नमूद केली आहे. दरम्यान, आयोगाचा हा निर्णय शासन निर्णयाच्या आणि न्यायालयाच्या आदेशांच्या विसंगत आणि त्यांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत एमपीएससीच्या या मनमानी कारभाराविरोधात अ‍ॅड. अजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.

यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, तसेच शासनाचा त्याबाबतच्या निर्णयाकडे कानाडोळा करून या उमेदवारांना खुल्या वर्गातील जागांसाठी अर्ज करण्यापासून रोखण्याचे कारण काय, असा सवाल करत एमपीएससीच्या सगळ्याच प्रवेश प्रक्रियांना मागील सुनावणीच्या वेळी स्थगिती दिली होती. यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली.