Fri, Apr 26, 2019 03:10होमपेज › Pune › मुख्यमंत्री, तुम्‍हाला आक्रोश एकू येत नाही का? : सुप्रिया सुळे

शिक्षक भरतीवरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: Feb 06 2018 10:09AM | Last Updated: Feb 06 2018 10:09AMपुणे : पुढारी ऑनलाईन

शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेता पण पदे भरत नाही. त्यामुळे तरुणांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतेय. त्यांचा आक्रोश मुख्यमंत्री तुम्हाला ऐकू येत नाही का?, असा प्रश्न करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षक भरती प्रश्नी सरकारवर टीकास्‍त्र सोडले. खासदार सुळे यांनी टि्‍वटरवरून या प्रश्नाला हात घातला. त्यानंतर डीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी संतप्‍त प्रतिक्रिया देत याप्रकरणी सुळे यांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 

शिक्षक भरतीवरून महाराष्‍ट्रातील डीएड व बीएडधारक विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्य सरकारने २०१३ पासून शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा घेणे सुरू केले. तेव्‍हापासून पात्रता परीक्षा नियमित सुरू आहे. मात्र, शिक्षक भरती झालीच नाही. तसेच २०१७ मध्ये पुन्‍हा अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी या नावाने परीक्षा सुरू केली. तरीही प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. त्यामुळे बीएड, डीएड पात्रकाधारक विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सरकारच्या या धोरणाच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‍वीट केले आहे. यात त्यांनी, "शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेता पण पदे भरत नाही. शिक्षक जादा झाल्याचे कारण सरकार देतेय. एकीकडे शाळा बंद करण्याचा घाट, तर दुसरीकडे आवश्यकता पण पदे भरण्याची मानसिकता नाही. या तरुणांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतेय. त्यांचा आक्रोश मुख्यमंत्री तुम्हाला ऐकू येत नाही का?, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. 

खासदार सुळे यांच्या या ट्‍वीटनंतर अनेक विद्यार्थ्यांनी रिट्‍वीट करत आपल्या मनातील असंतोष व्यक्‍त केला आहे. एका विद्यार्थ्याने, "ताई शिक्षक भरती लवकर करण्यात यावी या बद्दल तुम्ही आवाज उठवावा, मी खूप तणावात आहे आमच्या मधील एकाने आत्महत्या पण केलीय कृपया याची आकडेवारी नका वाढवू देऊ, अशी प्रतिक्रिया दिली. 

या विद्यार्थ्याच्या उद्‍विग्‍न प्रतिक्रियेवर सुळे यांनी, "तुमची प्रतिक्रिया वाचली. ही परिस्थिती खरंच खुप कठीण आहे .परंतु तुम्ही धीर सोडू नका. या सरकारला तुमचे ऐकावेच लागेल. मी तुमच्या सोबत आहे," अशा शब्‍दांत सुप्रिया सुळे यांनी डीएड, बीएड पदवीधारकांना धीर दिला.