Thu, May 23, 2019 05:20होमपेज › Pune › .. तर आरक्षण का नाही : उदयनराजे

.. तर आरक्षण का नाही : उदयनराजे

Published On: Aug 03 2018 9:57AM | Last Updated: Aug 03 2018 6:18PMपुणे : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली आंदोलनाची परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही. काही अनुचित घडण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा असे खासदार उदयनराजे म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच मराठा आरक्षण लांबणीवर पडलं आहे. कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का दिलं नाही? इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा का प्रलंबित ठेवला? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

ॲट्रॉसिटी कायद्याबाबात जेवढी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता मराठा आरक्षणसाठी केंद्र सरकारनेही दाखवावी. आवश्यकता पडल्यास घटनेत बदल करा. घटना ही माणसांनी माणसांसाठी लिहिली.  58 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे म्हणाले की, आम्हालासुद्धा समान न्याय मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे. मराठा आरक्षण परिषद भरवून सर्व समन्वयकांचे मत जाणून घेणार आहोत. त्या परिषदेत जो निर्णय होईल त्याला सर्वांची मान्यता असेल. 25-30 वर्षे झाली फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. इतर कुठल्याही समाजाचा आरक्षणाला विरोध नाही, मग उशीर का ? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला. अजून किती टोलवाटोलवी करणार उद्या राज्यात भडक उडाला तर कोण जबाबदार असणार. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे उदयनराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी नेतृत्व करणार का असे विचारले असता उदयनराजे म्हणाले की, खासदार म्हणून मी ही परिषद घेत नाही, आंदोलनाला दिशा देण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही परिषद असेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे. ही दिशा हिंसक नसावी, कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी ही दिशा नसावी. आरक्षणासाठी हिंसेचा मार्ग पत्करु नका असे आवाहनही उदयनराजेंनी केले. 518 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचे सरकारने विचार करावा. सरकारने तेव्हाच यावर तोडगा काढला असता तर ही परिस्थिती आली नसती असे उदयनराजे म्हणाले.

मराठा समाजाच्या वेदना समजून न घेता सरकारने त्यांच्यावर दरोड्यासारख्या केसेस टाकल्या. शासनाने आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घ्यावेत. नाहीतर समाजात भडका उडेल आणि हे सर्व थांबविण्यासाठी कुणी नसेल. आरक्षण मिळावे इतकीच माफक अपेक्षा या समाजाची असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले.

काय म्‍हणाले खासदार उदयनराजे?

मराठा आरक्षणासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढे येण्याची गरज

आंदोलकांवरील गुन्‍हे मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल

आरक्षण लांबवणार आहोत याची घोषणा तरी करा. आम्‍ही जनतेला काय सांगायचं ते सांगा.

अध्यादेश वगैरे काही कामाचे नाहीत. 

सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा आरक्षणासाठी माणुसकी दाखवावी

मराठा आरक्षण परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार

आज विरोधीपक्ष म्हणतोय आरक्षणाचा प्रश्न सोडवा, मग तुम्ही सत्तेत असताना का सोडविला नाही?

मागासवर्गीय आयोगाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली

आयोगाचा अहवाल सादर होण्यास सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.

लवकर पाठवण्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी आहे.

राज्य शासनाने तांत्रिक काम करणारे मनुष्यबळ पुरविले पाहिजे