Tue, Mar 19, 2019 20:50होमपेज › Pune › खासदार अमर साबळे यांचा दलितवस्तीमध्ये मुक्काम

खासदार अमर साबळे यांचा दलितवस्तीमध्ये मुक्काम

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:47PMवडगाव मावळ : वार्ताहर 

वेळ रात्री 8 ची.. आलिशान गाड्यांचा ताफा दाखल झाला आणि गाडीतून उतरलेले खासदार अमर साबळे यांनी कार्यकर्त्यांसह थेट दलितवस्तीमध्ये प्रवेश केला. पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत तिथेच रात्रीचे जेवण अन् मुक्कामही केला व तेथील दलित बांधवांशी संवाद साधला. 

खासदार साबळे यांच्या ह्या अचानक भेटीमुळे दलितबांधवांसह वडगावकर नागरिकही अचंबीत झाले, परंतु, हे निमित्त होते केंद्र शासनाच्या ग्रामस्वराज्य अभियानाचे. या अभियानांतर्गत खासदार साबळे यांनी वडगाव शहरातील मिलींदनगर दलितवस्तीमध्ये मुक्काम करुन दलित बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.

यावेळी खासदार साबळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्कराव म्हाळसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, तहसिलदार रणजीत देसाई, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, चंद्रशेखर भोसले, प्रवीण चव्हाण, राणी म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, सोमनाथ ढोरे, अनंता कुडे, महेंद्र म्हाळसकर, नितीन कुडे, किरण भिलारे, चंद्रजीत वाघमारे, सुशिला ओव्हाळ, अजय भवार आदि उपस्थित होते.

केंद्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि.14 एप्रिल ते 5 मे पर्यंत केंद्रातील प्रत्येक मंत्री व खासदारांनी या अभियानांतर्गत दलितवस्तीमध्ये मुक्काम करुन दलित बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेण्याची सुचना केली होती, त्यानुसार खासदार साबळे यांनी ही भेट दिली.

खासदार साबळे यांनी माजी ग्रा.पं.सदस्या सुशिला ओव्हाळ यांच्या घराच्या आंगणात बसून दलितबांधवांसोबत पिठले भाकरी, वांग्याची भाजी, ठेचा, पुलाव भात असा गावठी भोजनाचा आस्वाद घेतला व येथील ताराबाई ओव्हाळ यांच्या घरामध्ये मुक्काम केला. गुरुवारी (दि. 3) सकाळी बुध्दवंदना करुन कामाला सुरुवात केली व येथील डॉ. आंबेडकर कॉलनीमध्ये जावून स्वच्छता अभियान राबविले. यानंतर खासदार साबळे यांनी आमदार संजय भेगडे, सभापती म्हाळसकर, उपसभापती कदम, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पं.स.सदस्या सुवर्णा कुंभार, ज्योती शिंदे आदींच्या उपस्थितीत तहसील, पंचायत समिती, एस.टी.आगार, शिक्षण, आरोग्य, आदिवासी प्रकल्प इ. विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.