Thu, May 23, 2019 15:10
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › दूध आंदोलन ते राम मंदिर; राज ठाकरेंचा सरकारवर ‘नीट’ वार

दूध आंदोलन ते राम मंदिर; राज ठाकरेंचा सरकारवर ‘नीट’ वार

Published On: Jul 18 2018 12:47PM | Last Updated: Jul 18 2018 12:51PMपुणे : पुढारी ऑनलाईन

राज्य सरकार वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करतेय मात्र आधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, जर बाहेरच्या मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न झाला तर त्या विद्यार्थ्यांवर  बारीक लक्ष राहील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ‘नीट’सह राज्यातील इतर प्रश्नांसह राज्यसरकारवर जोरदार टीका केली. 

सध्या राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती असतानाही सरकारने संबंधित संघटना आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. यामुळे राज्य सरकारला नक्की काय करायचे आहे? असा प्रश्न पडतो. राज्यात अमूलसह इतर दूधसंघांना घुसवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचा कारभार केंद्रातून चालवला जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

काल पावासळी अधिवेशनात शिवस्मारकावरुन रणकंदन झाले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकार फक्त राजकारण करत आहे. छत्रपतींच्या स्मारकाला मी विरोध केला होता, कारण महाराजांचे गडकिल्ले यावर खर्च करायला हवा, ती खरी संपत्ती आहे त्याचे संवर्धन करायला हवे. सध्या बुलेट ट्रेनचीही चर्चा सुरु आहे. पण ही ट्रेन मुंबईल महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.  

राम मंदिर झालं पाहिजे हे फक्त निवडणुकीचे कारण म्हणून नको. आता विकास झाला नाही म्हणून चार वर्षांनी राम मंदिराची आठवण झाली. निवडणुका जवळ आल्यानेच अशी अचानक आठवण आली असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.  

नोटाबंदी केल्यानंतरही भ्रष्टाचार, काळापैसा उघड होतो आहे. नोटाबंदी केली ती दगडावरच काय असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. देशात फिटनेस चॅलेंज सुरु झाले होते त्यावरुनही त्यांनी जोरदार हल्ला केला. अगोदर देश फिट करा नंतर फिटनेस चॅलेंजचे बघा असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

नीटच्या परिक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या राज ठाकरे यांना सांगितल्या होत्या. त्यासंदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. इतर राज्यांत प्रवेशासाठी नियम आहेत ते आपल्या राज्यातही लागू करण्याची मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली.