Thu, Apr 25, 2019 11:51होमपेज › Pune › ‘एमएनजीएल’चा गॅस पोहोचला एक लाख घरांत...

‘एमएनजीएल’चा गॅस पोहोचला एक लाख घरांत...

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:23PMपुणे : नरेंद्र साठे

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीने(एमएनजीएल), पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख घरगुती गॅस जोडणीचा टप्पा ओलांडला आहे. पुणे महापालिकेने खोदाईचे दर कमी केल्यामुळे 78 टक्के गॅस जोडणी झाली. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र गॅसची जोडणी अत्यल्प प्रमाणात झाली आहे. त्यास महापालिकेचे धोरण कारणीभूत असल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले.

पुण्यामध्ये 2006 पासून आत्तापर्यंत 1 लाख 3014 घरगुती गॅस जोडणी करण्यात आली आहे. 2006 पासून 2017 पर्यंत केवळ 50 हजार आणि 2017-18 या वर्षात 50 हजार गॅस जोडणी करण्यात आली. एमएनजीएलने मागील आर्थिक वर्षात मोठे उद्दिष्ट ठेवून त्यादृष्टीने कामाचा पाठपुरावा केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. 

पुण्यामध्ये 2017-18 मध्ये 35 हजार 760 गॅस जोडणी करून मागील वर्षीपेक्षा 24 हजार 940 अधिक ग्राहकांना गॅस जोडणी करून दिली तर पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ 16 हजार 403 गॅस जोडणी झाली असून, गत वर्षीपेक्षा केवळ 6 हजार 970 गॅस जोडणी वाढल्या आहेत. पुण्यात 78 टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये 22 टक्के गॅस जोडणी झाली असून, पिंपरी-चिंचवडमध्ये जोडण्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे महापालिकेने खोदाईसाठी आकरलेले जास्तीचे दर. पिंपरी-चिंचवड महापालिकेने एमएनजीएलसाठी खोदाईचे दर कमी केले नाही तर पुढील वर्षी देखील पिंपरी-चिंचवडकरांना गॅसपासून वंचितच राहावे लागणार आहे.

पुण्यात आतापर्यंत 63 हजार 462 गॅस जोडणी तर पिंपरी-चिंचवडमध्ये 39 हजार 552 घरगुती गॅस जोडणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2016-17 मध्ये 20 हजार 253 आणि 2017-18 मध्ये 52 हजार 163 घरगुती गॅस जोडणी करण्यात आली. 

सिलेंडरपेक्षा सुरक्षित आणि थेट घरापर्यंत गॅस मिळत असल्याने नागरिकांचा गॅस पाईपलाईनद्वारे गॅस घेण्याकडे कल वाढला आहे. एमएनजीएलकडून विविध सवलती देऊन, ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. त्याचसोबत एखाद्या पूर्ण सोसायटीच्या गॅस जोडणीसाठी देखील सवलती देऊ करण्यात आल्या आहेत.  लहान आकाराच्या रस्त्यावरून खोदाई करून नागरिकांना गॅस पुरवठा करताना एमएनजीएलला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छोट्या रस्त्यावर खोदाईची परवानगी मिळत नाही कारण, तेथील वाहतुकीचा खोळंबा होतो.

एक वर्षात एक लाखाचे ‘टार्गेट’

एक लाखांपेक्षा अधिक गॅस जोडणी झाली असून, आता पुढील एका वर्षातही एक लाख घरगुती गॅस जोडणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये प्रत्येकी पन्नास हजार गॅस जोडणी करण्यात येणार आहे; परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहकार्याची भूमिका ठेवली नाही तर हे शक्य होणार नाही. - संतोष सोनटक्के, वाणिज्यिक संचालक, एमएनजीएल

 

Tags : pune, pune news, MNGL gas, households,