Mon, Jan 21, 2019 16:27होमपेज › Pune › खा. शरद पवारांच्या घरासमोर आ. अजित पवार यांचा ठिय्या!

खा. शरद पवारांच्या घरासमोर आ. अजित पवार यांचा ठिय्या!

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMबारामती : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाकडून गुरुवारी (दि. 9) खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांचे निवासस्थान असलेल्या ‘गोविंद बागे’समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती झेंडा घेत या आंदोलनात सहभाग घेतला. ‘एक मराठा लाख मराठा...’, ‘असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणाही पवार यांनी माईकवरून देत आरक्षणप्रश्नी समाजासोबत असल्याचे स्पष्ट केले.

बारामती-निरा रस्त्यावरील गोविंद बागेसमोर होणार्‍या या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. त्या पार्श्वभूमीवर येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 8 पासूनच ‘गोविंद बाग’ परिसरात मराठा तरुण येण्यास सुरुवात झाली. सकाळी 9 नंतर ही गर्दी वाढत गेली. महिला, युवती व तरुणांसोबतच समाजातील सर्वच घटक या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झाली. बारामती-निरा रस्त्यावरच ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. ठिय्या आंदोलनावेळी कोणतीही भाषणे झाली नाहीत. सर्वपक्षीयांचा त्यात सहभाग होता.

इंटरनेट सेवा बंद

गुरुवारी सकाळपासूनच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परिणामी सोशल मीडियावरून पसणार्‍या अफवांना आळा बसला. परंतु, रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेली इंटरनेट सेवाच बंद पडल्याने मन:स्तापाचीही वेळ आली.