Sun, May 26, 2019 11:38होमपेज › Pune › आमदार सोनवणे महिला पोलिस अधिकार्‍याला अश्‍लील बोलले

आमदार सोनवणे महिला पोलिस अधिकार्‍याला अश्‍लील बोलले

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:21AMआळेफाटा : वार्ताहर

‘मनसे’चे राज्यातील एकमेव आमदार, जुन्नरचे शरद सोनवणे यांच्यावर महिला पोलिस अधिकार्‍याला सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील बोलून सरकारी कामात अडथळा केल्याने आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर याआधी अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत.

मागील काही काळात आ. सोनवणे यांच्यावर अधिकारी, कर्मचार्‍यांना मारहाण, धमकावणी केल्यासंदर्भात तीन गुन्हे जुन्नर आणि आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळे या घटनांमुळे जुन्नर तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तालुक्यातील राजकीय व्यवस्था व कायदा सुव्यवस्थाच बिघडली आहे काय, असा प्रश्‍न यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आळेफाटा ठाण्यातील महिला सहायक निरीक्षकांनी रेशनिंगच्या (संशयित) गव्हाची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या योगेश भोडवेची पिकअप गाडी पकडली होती; त्यावर त्या रितसर कायदेशीर कारवाई करीत होत्या. 

 योगेश भोडवे हा आ. शरद सोनावणे यांचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर कारवाई होत असल्याचा राग मनात धरून आमदार सोनावणे हे 40 ते 50 लोकांसह आळेफाटा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी सर्वांसमक्ष ‘मी तुला ऑफीसला बोलावुन तु का आली नाहीस...?’ असे महिला सहायक निरीक्षकाला खडसावले. यावेळी आ. सोनवणे माझे अंगावर तावातावाने धावुन आले. मी रितसर कारवाई केलेली बेकायेदेशीर रेशनिगच्या गव्हाची गाडी सोडण्यासाठी आ. सोनवणे यांनी माझेवर दबाव आणल्याची तक्रार संबधीत महिला अधिकार्‍याने दिली आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. 353, 509, 186, 294 अन्वये गुन्हा आ.सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापुढील तपास गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करत आहे.

आमदारांची चौकशी करून नोटीस बजावली

शनिवारी दुपारी दोन च्या दरम्यान आळेफाटा पोलीस ठाण्यात आमदार शरद सोनावणे हजर झाले सांयकाळी 7.45 वाजेपर्यंत आळेफाटा पोलीसानी त्यांची चौकशी केली.  यावेळी पोलिस उपअधीक्षक राम पठारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी आमदार सोनवणे यांची कसून चौकशी केली. त्यानंतर याबाबत आमदाराना याप्रकरणाच्या तपासकामासाठी सी.आर.पी.सी 41(2)नुसार चौकशी नोटीस पोलीसांनी बजावली आहे. दुपार पासूनच आळेफाटा पोलीस ठाण्याच्या आवारात कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हणून कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता.