Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Pune › ‘एमआयएम’चा नगरसेवक  सय्यदचे हातपाय तोडले असते

‘एमआयएम’चा नगरसेवक  सय्यदचे हातपाय तोडले असते

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:08AMपिंपरी : प्रतिनिधी

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करण्यार्‍या ‘एमआयएम’ पक्षाचा नगरसेवक मतीन सय्यद याने विरोध केला. मी तेथे असतो तर, त्या नगरसेवकास केवळ मारले नसते तर, त्याचे हातपाय तोडले असते, अशी मुक्‍ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी सोमवारी (दि.20) पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात उधळली. 

अशा लोकांना भारतभूमीत राहण्याचा अधिकार नसून, त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावे, असा सल्लाही त्यांनी एमआयएमचे नेते खासदार अशदुद्दीन ओवैसी यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात बाके व टाळ्या वाजवून स्वागत केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत  वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना ते बोलत होते. शेख म्हणाले की, पंतप्रधान हा कोणत्याही जाती, धर्माचा किंवा पंथाचा नसतो. वाजपेयी हे देशातील प्रत्येक गरीब-श्रीमंत नागरिकांचे  पंतप्रधान होते. राजकारणात त्यांच्यावर  विरोधकही मनापासून प्रेम करतात. ते सर्वधर्मसमभावाचे प्रतिक होते. मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात वाजपेयी यांनी पाकिस्तानवर एकही गोळी न झाडण्याचे आदेश भारतीय लष्कराला दिले होते. 

दुर्दैव असे की, पाकिस्तानने तो नियम पाळला नाही, आणि तो करार रद्द झाला. त्यांच्या अशा निर्णयामुळे देशातील सर्वधर्मीय लोक त्यांच्यावर प्रेम करतात. असे असताना  भारतात राहून वायपेयींसारख्या थोर नेत्यांच्या श्रध्दांजली सभेस विरोध करणार्‍या ‘एमआयएम’च्या नगरसेवकाची कृती देशविरोधी आहे.