Thu, Apr 18, 2019 16:23होमपेज › Pune › पक्षवाढीत ‘एमआयएम’च्या ‘पतंग’चा दोर तुटला

पक्षवाढीत ‘एमआयएम’च्या ‘पतंग’चा दोर तुटला

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 11 2018 10:43PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड शहरात ‘एमआयएम’चे काम मोठ्या उत्साहात सुरू होते. दलित, मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक जातींमध्ये पक्षाची ‘क्रेझ’ निर्माण झाली होती. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाला शहरातून 18 हजार मते मिळाली; मात्र राज्य कार्यकारणीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. महापालिका निवडणुकी वेळीही पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नियोजित सभाही रद्द झाली. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाचे कामकाज थांबवले. राज्यात पक्ष वाढविण्याचा विचार खा. ओवेसी करत आहेत; मात्र राज्य कार्यकारिणीकडून न्याय मिळत नसल्याने पक्षवाढीच्या प्रक्रियेत पिंपरी-चिंचवडमधील ‘एमआयएम’च्या ‘पंतग’चा दोर तुटला असल्याचे चित्र आहे.

देशभरात ‘एमआयएम’ आणि खा. ओवैसी यांच्याबद्दल मुस्लिम, दलित व इतर समाजामध्ये कुतूहल आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातही ‘एमआयएम’ पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अकिल मुजावर यांनी त्यासाठी शड्डू ठोकले. त्यांच्यासोबत धम्मराज साळवे व इतरही पक्षाचे कामकाज प्रामाणिक करू लागले. अकिल मुजावर यांनी या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडात्मक व राजकीय प्रश्‍नांबाबत पाठपुरावा केला आहे. 

उर्दू शाळेच्या अडचणींबाबत वारंवार आंदोलनाचे हत्यारही उपसले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतच पक्षाने अकिल मुजावर यांना शहराध्यक्षपदी नियुक्‍ती केली. शहरात मुस्लिम, दलित व इतर अल्पसंख्यांक जातींमध्ये पक्षाचा प्रचार करून कार्यकर्ते जोडले. पक्षाची शहर कार्यकारिणीही बांधण्यात आली.  महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणूक रिंगणात पक्षाने पहिल्यांदाच 14 उमेदवार  उभे केले होते. त्यांना 18 हजार मते मिळाली होती. त्यामुळे पक्षातील लोकांचा उत्साह दुणावला होता; मात्र महापालिका निवडणुकीवेळी खा. असदुद्दीन ओवैसी यांची नियोजित सभा राज्य कार्यकारिणीच्या चुकीच्या नियोजनाने रद्द झाली. त्यामुळे शहरातील पक्षवाढीला खो बसला.

अकिल मुजावर यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची योग्य वाटचाल सुरू होती. महापालिका निवडणुकीत खा. ओवैसी यांच्या सभेची जोरदार तयारी शहरात केली होती. त्यामुळे किमान दोन नगरसेवक निवडून येण्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांना होता. ऐनवेळी सभा रद्द झाली. कार्यकर्ते नाराज झाले. या सभेबाबत खा. ओवैसींना माहितीच दिली गेली नसल्याचे पक्षातील एका कार्यकर्त्याने सांगितले. शहरातील कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवत पक्षाचे कामकाज थांबविले. अकिल मुजावर यांना इतर पक्षाकडून ‘ऑफर’ दिल्या जात आहेत. अद्याप त्यांनी या बाबत कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शहरात एमआयएम पुन्हा उभारी घेणार का? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये आहे.