होमपेज › Pune › ‘एमडीआर टीबी’चे 40 रुग्ण

‘एमडीआर टीबी’चे 40 रुग्ण

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

शहरात जानेवारीपासून आतापर्यंत ‘मल्टी ड्रग रेझिस्टन्स’ (एम. डी. आर.) टी. बी. चे 40 रुग्ण आढळून आले आहेत. या प्रकारच्या टीबीमध्ये मृत्युदर जवळपास 40 टक्के असून, त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करणे एक आव्हान बनले आहे. या प्रकारचा क्षयरोग होऊच नये यासाठी काळजी घेणे हाच यावरील महत्त्वाचा उपाय असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. 

महापालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयात ‘सीबीनॅट’ या अद्ययावत उपकरणामुळे दोन दिवसांतच थुंकीच्या नमुन्याद्वारे एम. डी. आर. टी. बी. चे निदान होते. ज्या रुग्णांचा आजार सर्वसाधारण टी. बी. च्या औषधांनी बरा होत नाही, त्यांच्या थुंकीचे निदान या उपकरणाद्वारे करण्यात येते. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या यावर्षी जानेवारीपासून पाच जुलैपर्यंत 40 रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक महिन्यात सरासरी पाच तर एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक 8 ते 10 रुग्ण आढळून आले आहेत.

क्षयरोग्याने  सुरुवातीचा उपचार नीट न घेणे, औषधे वेळेवर व पूर्ण कालावधीसाठी न घेणे, रोगप्रतिकार क्षमता इतर कारणांमुळे कमी होणे, अशा कारणांमुळे सध्या एमडीआर टीबीचा प्रसार वाढत आहे. साध्या क्षयरोगाचा उपचार हा कमी कालावधीचा म्हणजे 6-9 महिन्यांचा असतो, परंतु रुग्ण सुरुवातीस 1-2 महिने औषधे घेतात व काही दिवसांनी औषध घेण्याचे सोडून देतात, अशा रुग्णांमधील क्षयरोगाचे जंतू नेहमीच्या ‘आपसोनियाझइड’ व ‘रिफॅपिझीन’ या दोन्ही औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे वेगळी व अधिक पॉवरची औषधे 25 ते 30 महिन्यांसाठी घ्यावी लागतात. त्याचा इतर अवयवांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.