Thu, Jul 18, 2019 17:19होमपेज › Pune › एम.फिल, पीएच.डी. प्रवेशाच्या तब्बल अकराशे जागा

एम.फिल, पीएच.डी. प्रवेशाच्या तब्बल अकराशे जागा

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबविण्यात येणार्‍या एम. फिल. आणि पीएच.डी. प्रवेशासाठी विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता दुसर्‍या फेरीसाठी मुलाखत दिलेल्या परीक्षार्थींसाठी साधारण अकराशे जागा विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. 

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या विभागांमध्ये पीएच. डी अभ्यासक्रमाच्या पीएच. डी.च्या 2 हजार 990 जागांवर प्रवेश घेण्यासाठी ‘पेट’ गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला झाली. या परीक्षेला 9 हजार 588 विद्यार्थ्यांमधून 2 हजार 847 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत सुमारे दोन महिन्यापूर्वी झाली. या मुलाखतीमध्ये पीएच.डी प्रवेशाच्या नियमावलीव्यतिरिक्त इतर प्रश्न विचारण्याला तज्ज्ञांच्या समितीने भर दिला. तर काही विभागांमध्ये मुलाखतीदरम्यान, ‘आम्ही विभागाच्या कामकाजामध्ये मदत करणारा विद्यार्थी शोधतोय,’असे सांगण्यात आले.

एका विभागप्रमुखाने मुलाखत होण्यापूर्वीच दोन विद्यार्थ्यांना ‘आमच्याकडे जागा कमी आहेत आणि मी यापूर्वी काही विद्यार्थी निवडले आहेत. त्यामुळे तुमचा नंबर लागणार नाही,’ असे सांगितले. या प्रकारांमुळे मुलाखती पारदर्शक होण्याबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. एखाद्या विभागामध्ये प्रवेशासाठी पाच जागा उपलब्ध असतील, तर तीन ते चार जागा भरण्यात आल्या. अशाच प्रकारे एका विभागात चार जागांपैकी दोन जागा भरण्यात आल्या असून दोन कारण नसताना रिक्त ठेवण्यात आल्या. संबंधित जागांसाठी परीक्षार्थी उपलब्ध असून देखील जागा रिक्त ठेवल्याने परीक्षार्थी नाराज होते.

त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्राध्यापकांना (मार्गदर्शक) त्यांच्याकडे असणार्‍या रिक्त जागांची माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही प्राध्यापकांनी रिक्त जागांची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे पाठविली होती. या माहितीच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने ‘एमफिल’ आणि पीएच.डीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या असून त्यांची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

‘पेट’ परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र होणार्‍या परीक्षार्थींची तज्ज्ञ समितीतर्फे मुलाखत घेण्यात येते. अशातच मुलाखत घेणारे आणि देणारे एकाच महाविद्यालयातील असल्याचा प्रकार गेल्या मुलाखतीत घडला. तर, काही ठिकाणी इतर महाविद्यालयांमधून उच्च शिक्षण घेतलेल्या परीक्षार्थींऐवजी विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण करणार्‍या परीक्षार्थींना प्रवेशासाठी झुकते माप दिल्याचा आरोप परीक्षार्थींकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुलाखत घेणारी समिती ही तज्ज्ञांची असावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

रिक्त जागांची माहिती देण्याची मागणी 

‘एम.फिल.’ आणि पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया संथ गतीने पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आम्हाला प्रवेश कधी मिळेल, अशी विचारणा मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या परीक्षार्थींकडून होत आहे. या प्रक्रियेत काही प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक अजूनही त्यांच्याकडे रिक्त असणार्‍या जागांची माहिती भरलेली नाही. त्यामुळे अशा प्राध्यापकांना विद्यापीठाने पुन्हा आदेश देऊन त्यांच्याकडून जागांची माहिती मागावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

 

Tags : pune, pune news, pune university, M Phil, Ph D, entry,