Sun, Jul 21, 2019 08:15होमपेज › Pune › दृष्टी गमवलेल्या ज्येष्ठाला मिळाले त्यांचे कुटुंब

दृष्टी गमवलेल्या ज्येष्ठाला मिळाले त्यांचे कुटुंब

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

नेपाळमधील एका ज्येष्ठ नागरिकाला रत्नागिरीत एका घटनेत दृष्टी गमवावी लागली. ससूनमध्ये तीन महिने उपचार केल्यानंतर पुनर्वसनासाठी त्यांना निगडीतील किनारा वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. तेथून सुरू झाली ती त्यांच्या कुटुंबियांच्या शोधाची मोहिम.

त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार शोध सुरू झाला. पण, प्रत्येकवेळी अपयश येत होते. गुगल आणि नंतर फेसबुकच्या आधारे नेपाळमध्ये संपर्क साधणे शक्य झाले. यातून त्यांच्या लहान भावाशी संपर्क झाला आणि दोन दिवसांपूर्वी मीन बहादूर तिलकसिंग बंब यांना त्यांचा भाऊ गणेश नेपाळला घेऊन गेला.

रत्नागिरीतील एका आंब्याच्या बागेत बंब हे रखवाली करायचे. तेथे बागेची  राखण  करीत  असताना,  काही  तरुण  मुलांनी त्यांना रागाने मारहाण केली आणि त्यामध्ये  त्यांना दोन्ही  डोळे  गमवावे  लागले. त्यात मोबाईल हरवल्याने त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधता येत नव्हता. मग किनारातील सभासदांनी बंब यांनी सांगितलेल्या पत्त्यावर रत्नागिरी येथे संपर्क केला. तेथे काही हाती लागले नाही.

त्याचवेळी, नेपाळला आपले घर व शेती आहे आणि शेजारीच भाऊ राहतो असे त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांच्या मदतीने नेपाळमध्ये संपर्क करून त्यांच्या नातेवाईकांना हुडकण्यात किनाराच्या टीमला यश आले. नेपाळ पोलिसांशी संपर्कानंतर पाच तासात बंब यांच्या लहान भावाचे घर पोलिसांनी शोधून त्यांना किनाराचा फोन नंबर दिला आणि दोघा भावांचे संभाषण झाले.

भाऊ सापडला...आता मुलगाही भेटेल...नेपाळला जायचे, या  विचारांनी बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. गणेश मोठ्या भावास घेण्यास आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. दोन भावांची झालेली भेट पाहून उपस्थित सर्वजण गहिवरले होते.