Fri, Jul 19, 2019 13:50होमपेज › Pune › टेमघरच्या गळतीमुळे दोन टीएमसीचा तोटा

टेमघरच्या गळतीमुळे दोन टीएमसीचा तोटा

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 12:31AMखडकवासला  : वार्ताहर  

टेमघर धरणाच्या गळतीमुळे दोन टीएमसीचा तोटा होणार आहे. गळतीचे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा जलसंपदा विभाग करत असले तरी टेमघरच्या गळतीमुळे दोन टीएमसी पाण्याचा फटका उन्हाळ्यात   यंदाही पुणेकरांसह शेतीला  बसणार असल्याचे चित्र समोर आले आहे. विक्रमी पाऊस पडूनही टेमघर    धरणात 1.71 टीएमसी म्हणजे  पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा केला जाणार  आहे. टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता 3.76 टीएमसी इतकी असून कमी पाणीसाठ्यामुळे  दोन टीएमसी पाण्याचा तोटा उन्हाळ्यात पुणेकरांसह शेतीला बसणार आहे. 

टेमघर धरणाच्या भिंतीतून होणारी पाण्याची 84 टक्के गळती बंद झाल्याचा दावा टेमघर जलसंपदा विभागाने केला आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा करण्यात येणार असल्याचे टेमघर जलसंपदा विभागाचे उपविभागिय अभियंता आर. के. कुंजीर यांनी सांगितले.  टेमघर धरणात सध्या 2.60 टीएमसी म्हणजे 70.09 टक्के इतका पाणीसाठा आहे. असे असले तरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणात 1.71 टीएमसी इतके पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे धरणातून 600 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

1995 मध्ये टेमघर धरणाचे काम  सुरू झाले. बांधकाम  निकृष्ट दर्जाचे झाल्याने भिंतीचे बांधकाम पूर्ण होण्याच्या आतच भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. त्यामुळे गेल्या वर्षीपासून गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. टेमघर जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता आर. के. कुंजीर म्हणाले,   गळती बंद करण्याचे काम दर्जेदार व आधुनिक  तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जात आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात   गळती बंद झाली आहे. मुख्य भिंतीतून पाण्याचे फवारे उडत असत. सध्या जवळपास 84 टक्के पाण्याची गळती बंद झाली आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठवले जाणार आहे. 

टेमघरच्या गळतीचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याचे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारयांनी स्पष्ट केले होते.असे असताना प्रत्यक्षात धरणात पन्नास टक्केही पाणीसाठा यंदा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.टेमघरमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे   खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडून द्यावे लागत आहे.  खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वात अधिक विक्रमी पाऊस टेमघर येथे पडला आहे. 1 जूनपासून 27 जुलैपर्यंत टेमघर येथे 2253 मिलिमीटर इतका पाऊस पडला.