Thu, Apr 25, 2019 12:12होमपेज › Pune › अपघातात मुलं गमावल्याने ‘ती’ चे स्वप्न भंगले

अपघातात मुलं गमावल्याने ‘ती’ चे स्वप्न भंगले

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:20AMपिंपरी : संतोष शिंदे

मुले लहान असतानाच पतीचा मृत्यू झाला... दोन मुले घेऊन कुठं जाणार, माहेरच्या तोटक्या आधारावर तिने तोल सांभाळला. मुलांच्या जोरावर नशीब पालटून टाकण्याची तिची जिद्द होती..तिने धुण्याभांड्याची कामे करून मुलांना चांगले शिक्षण दिले. मोठ्या मुलाला नुकतेच एका फायन्सास कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळाली होती... धाकट्याला देखील आईच्या कष्टाची जाण होऊ लागल्याने त्याने शिक्षणाबरोबरच सकाळी पेपर टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही पोरं हाताला आल्याने घरात पैसा येऊ लागला होता. तिचे दिवस पालटले होते; मात्र तिचे हे सुख नियतीला मान्य नव्हते. देवीच्या दर्शनासाठी जाताना तिच्या दोन्ही मुलांचा अपघाती मृत्यू झाला. तरणी पोरं गमावल्याने ‘ती’चे स्वप्न भंगले होते. डोळ्यादेखत मृतदेह जळत असताना ‘आता मी जगायचं कुणासाठी’ असा हंबरडा तिने फोडला अन क्षणातच सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अनिता बालाजी सरवदे असे ’ती’चे नाव असून, तिने निखिल आणि प्रतीक अशी दोन मुले कार्ला येथे झालेल्या अपघातात गमावली आहेत. 

‘ती’ मूळची मराठवाड्यातील छोट्या गावातली. घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे तिने लहानपणापासून पोटाला चिमटे घेत आयुष्य घालवले. लग्नानंतर परिस्थिती बदलेल असे तीच ठाम मत होत. लग्न झाल्यानंतर काही वर्ष सुरळीत गेली. नंतरच्या काळात पतीला दारूचे व्यसन जडले अन  त्यातच त्याचा मृत्यू झाला. तिथून पुन्हा तिच्या आयुष्यातील एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली. पतीच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे ढासळली; मात्र मुलांसाठी पुन्हा सावरली. तिच्या आईने यात तिची मोठी साथ दिली. काळेवाडीतील एक छोटी खोली तिला मोकळी करून दिली. त्या छोट्या खोलीत तिने मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली.

मुलांच्या गरजा वाढल्या त्या पूर्ण करण्यासाठी तीने धुण्याभांड्याची कामे सुरु केली. त्यांच्या शिक्षणासाठी ‘ती’ प्रसंगी कर्जबाजारी झाली.पण मागे हटली नाही.  बघता बघता मुलं मोठी झाली. त्यांनीही परिस्थतीची जाण  ठेऊन चांगले शिक्षण घेतले. निखिलला एका फायनान्स कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळाली अन तिच्या खांद्यावरचा भार कमी झाला. निखिल तिला आता धुण्याभांड्याची कामे करू देत नव्हता. त्याने नुकतेच धाकट्या प्रतीकला एका दुचाकी घेऊन दिली होती. प्रतीक पहाटे चार ते सकाळी आठ पर्यंत दूध टाकण्याचे काम करू लागला. या कामातून त्याला नऊ हजार रुपये महिना मिळू लागला. निखिल आणि प्रतीक  दोघेही कमावते झाल्याने घरात पैसा येऊ लागला. तीचे दिवस पालटले होते. तिने थोरल्या निखिलच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यास सुरुवात केली होती. घरात सून आल्यानंतर तिच्या कष्टाला पूर्णविराम मिळणार होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 

निखिल कॉलनीतील मित्रांसोबत देवीच्या दर्शनासाठी निघाला. प्रतिकने देखील त्याच्यासोबत येण्याचा हट्ट केला. मात्र, निखिलने त्याला येऊ नको असे बजावले. तुला पाचशे रुपये देतो पण तू घरी बस अशी सक्ती केली. प्रतीक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने निखिलने माघार घेतली अन त्यालाही सोबत घेतले. त्यांनी रावेतच्या ‘हँगिंग’ पुलाजवळ फेसबुक लाईव्ह केले. पुढे जाऊन सोमाटणे फाटा येथे पुन्हा फेसबुक लाईव्ह करून त्यांनी मित्रांना जल्लोष आणि गाडीचा वेग दाखवला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही काहीच वेळातच त्यांना मृत्यूने गाठले. गाडीचा चक्काचूर होऊन त्यांच्यासह गाडीतील पाचजणांचा मृत्यू झाला. तिच्या डोळ्यादेखत तरूण मुलांचा देह जळत होता. डोळ्यादेखत तीचे काळीज जळत असताना तिने फोडलेला हंबरडा ह्रदयाचा ठाव घेणारा होता. 

कृष्णाचे जीवघेणे ‘गीफ्ट’ 

या अपघातात मृत्यू झालेल्या कृष्णा शिरसाठला कार चालवण्याची मोठी हौस होती. कृष्णा घरात लाडका असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला प्रेमाने स्विफ्ट कार भेट दिली होती. हेच गिफ्ट कृष्णासाठी जीवघेणे ठरेल, असे असे त्यांना स्वप्नांतही वाटले नाही. मात्र याच स्विफ्टमध्ये कृष्णाचा अपघाती अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरदीप कॉलनी खचाखच 

रहाटणीतील अमरदीप कॉलनीमध्ये तिघांचे पार्थिव सोमवारी (दि.16)  दुपारी आणण्यात आले. ही बातमी शहरात मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यांच्या पार्थिवाचे  दर्शनासाठी अमरदीप कॉलनीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शहरातील अनेक राजकीय पदाधिकार्‍यांनी देखील अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.