Thu, Jun 27, 2019 01:46होमपेज › Pune › एमपीएससी परीक्षार्थी काढणार लाँगमार्च

एमपीएससी परीक्षार्थी काढणार लाँगमार्च

Published On: May 19 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षेमधील डमी रॅकेट, नांदेड येथील पोलिस भरती घोटाळा प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी,  गट ‘अ’ ते गट ‘ड’ वर्गातील संपूर्ण परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्याव्यात, रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ‘सरकारी नोकरी भरती भ्रष्टाचारविरोधी संघर्ष समितीच्या वतीने पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात येणार आहे. 19 ते 25 मे दरम्यान होणार्‍या या पदयात्रेमध्ये राज्यभरातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शनिवारी (दि. 19) पुण्यातील डेक्कन येथील नदीपात्र चौपाटी येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती समितीचे पंकज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. योगेश जाधव, सागर दुर्योधन, महेश बडे, किरण निंभोरे, साई डहाळे, गिरीश फोंडे आदी या वेळी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, पुण्यातून सुरू होणारी ही पदयात्रा तळेगाव दाभाडे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे मार्गे आझाद मैदानावर पोहचणार आहे. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार्‍या मागण्यांचे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास समितीकडून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.