Tue, Apr 23, 2019 22:15होमपेज › Pune › रेल्वे विसरली लोणावळा लोकलचा वाढदिवस

रेल्वे विसरली लोणावळा लोकलचा वाढदिवस

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे-लोणावळादरम्यान ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) लोकल सुरू होऊन रविवारी (दि. 11) बरोबर चाळीस वर्षे पूर्ण झाली; मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला याचा पुरता विसर पडल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी 5.45 ते दुपारी 3.40 दरम्यान पुणे-लोणावळा लोकल ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या होत्या, हे जरी ग्राह्य धरले, तरीदेखील दुपारनंतर कार्यक्रमाचे आयोजन करत रेल्वेला वाढदिवस साजरा करता येऊ शकला असता; मात्र रेल्वेला लोणावळा लोकलच्या वाढदिवसाची कोणतीही कल्पना नसल्याचे दिसून आले. रेल्वे अधिकारी व प्रवासीदेखील याबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसले. 

11 मार्च 1978 रोजी पुणे-लोणावळा दरम्यान पहिली ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) लोकल धावली. यापूर्वी केवळ मुंबईतच दिसणारी लोकल पुणे-लोणावळा दरम्यान धावू लागली. सव्वा तासात पुणे-लोणावळा हे 63 किलोमीटर अंतर पार करता येऊ लागल्याने चाकरमान्यांची चांगलीच सोय झाली. सुरुवातील चार डबे असणारी लोकल कालांतराने सहा, मग दहा व आता बारा डब्यांची झाली. 1978 मध्ये केवळ काही हजारांच्या घरात असणारी प्रवासी संख्या 2018 मध्ये तब्बल दीड लाखांच्या घरात गेली आहे. पुण्याच्या आजूबाजूला झालेल्या नागरीकरणामुळे व पुण्यात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्याने प्रवासी संख्या झपाट्याने वाढली; परंतु चाळीस वर्षांनंतरही लोणावळा लोकल प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षित राहिल्या असून, त्यांची ससेहोलपट सुरूच आहे. 

गेल्या दशकभरापासून या मार्गावर लोकलचे चारच रेक उपलब्ध असून, दोन्ही बाजूंनी केवळ दररोज 44 फेर्‍याच होतात. यापैकी चार फेर्‍या पुणे-तळेगाव-पुणे दरम्यान होतात. या मार्गावर वयोमर्यादा उलटलेले रेक वापरतात असा आरोप दरवेळी करण्यात येतो. सद्यःस्थिती फारशी वेगळी नसून, सध्या चार रेकपैकी एक रेक जीर्ण झाला असून, दोन रेक पंधरा वर्षे जुने आहेत. 11 नोव्हेंबर 2017 ला सिमेन्सचा सहा वर्षे जुना रेक मुंबईतून पुणे यार्डात दाखल झाला. 

तीन नवेकोरे रेक दाखल होणार असे रेल्वे प्रशासनाने सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र वापरलेला केवळ एकच रेक दाखल झाल्याने प्रवाशांची घोर निराशा झाली असून, ज्येष्ठ नागरिक, महिलांना लटकून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.  दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आमचा सातत्याने अपेक्षाभंग केला असून, येत्या काळात तरी नवे रेक दाखल करून लोकलच्या फेर्‍या वाढवाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.