Sat, Jul 20, 2019 08:58होमपेज › Pune › ‘द्रुतगती’वर दरडी हटविण्याचे काम पुन्हा सुरु

‘द्रुतगती’वर दरडी हटविण्याचे काम पुन्हा सुरु

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 1:35AM

बुकमार्क करा

लोणावळा : वार्ताहर 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा (बोरघाट) घाटातील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या डोंगरावरील धोकादायक सैल दरडी हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहीमेला सुरुवात झाली आहे. यासाठी खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत मुंबईकडे जाणारी एक लेन कामादरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. 
एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, भातन बोगदा येथील एकूण दोन किलोमीटर अंतरावरील  धोकादायक सैल दरडी हटविणे व  संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार असून,  या दरड हटाव मोहीमेचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या कामासाठी सुमारे 65 कोटी खर्च  होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी खंडाळा  (बोरघाट) घाटातील खंडाळा व  आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठया दरडी कोसळल्या होत्या. दरडीच्या या नैसर्गिक दुर्घटनेतील आडोशी बोगदा येथील दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अवघ्या दीड महिन्यात खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. आठ किलोमीटर अंतरावरील दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही क्षणी दरड कोसळेल अशी भीती प्रवाशांमध्ये पसरल्याने यामार्गावरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तंज्ञाच्या मार्फत पहाणी केली होती. त्यांच्या पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली होती. 

या आठ ठिकाणी सैल झालेल्या दरडी व त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये यासाठी डोंगर पठारावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गतवर्षी 27 जुलैला सुरुवात करण्यात होती. हे काम मेका फेरी कंपनीने  स्पॅनिश व इटलीच्या तज्ञ कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे. याकाम करताना या तंज्ञाना निश्‍चित करण्यात आलेल्या ठिकाणा शिवाय इतर ठिकाणी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले होते. निदर्शनास आलेल्या ठिकाणीही उपाययोजना राबविण्या संदर्भात संबंधितांनी सूचित केले होते. त्यानुसार एक्सप्रेस वेवरील घाटमाथा परीसरातील दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या मोहिमेत खंडाळा एक्झिट ते भातन बोगद्यापर्यंत चार ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा ( किलोमीटर क्रमांक 47.910 ते 46.910) एक किलोमीटर अंतर, अमृतांजन पूल परिसरातील 190 मीटर अंतर, आडोशी बोगदा जवळील 215 मीटर अंतर तसेच भातन बोगदा परिसरातील 159 मीटर असे 1565 मीटर अतंरावर नव्याने व मागील मोहिमेतील अपूर्ण राहिलेल्या 465 मीटर असे 2030 मीटर अंतरावरील सैल झालेल्या दरडी हटविणे व त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहे.