लोणावळा : प्रतिनिधी
शहरात जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर हॉटेल साई मोरेश्वर समोर एका रिट्झ कारला (एम.एच.०४.डी. वाय.६३४६) भरधाव वेगातील आयशर टेम्पो ( एम.एच.०९.बी. सी.८२७८) ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मध्ये बसलेल्या एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिमा रामचंद्र बजाला (वय २२, रा.मिरारोड, ठाणे) या तरुणीचा उपचारदरम्याम मृत्यू झाला. पुजा किशोर गायकवाड (वय २३, रा. भोरेश्वर वसाहत, भोर, पुणे), पिस्तला तसलीमोंग सगतम (वय २१, रा.किपोनिग्या, नागालँड), सविता राय (वय २६, रा.सिक्कीम), सोबित राय (वय २१, रा.सिक्कीम) व झोहेब गुलाम मोहम्मद मेमन (वय ३०, रा. खातीमा मंजिल, महागिरी, ठाणे पश्चिम) अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. मोनिका आनंद लाल (वय २७, रा.लोणावळा) हिची प्रकृती गंभीर आहे.
अपघातातील सर्व मृत आणि जखमी मुली ह्या लोणावळ्यातीलच एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. कामाचे तास संपल्यामुळे त्या एका रिट्स कार मधून हॉटेलच्याच खंडाळा येथील स्टाफ रूम ला चालल्या होत्या. साधारण रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील पोलीस ट्रेनिंग स्कूल जवळ हॉटेल साई मोरेश्वर समोर मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणारा एक आयशर टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की गाडीच्या चालकासह चार मुली जाग्यावरच मृत झाल्या तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या. मृतांमधील एक मुलगी ही नागालँड येथील असून दोन जणी सिक्कीम राज्यातील आहे.
याशिवाय टेम्पो चालक देखील या अपघातात जखमी असून त्याचा पायाला मार लागला आहे. सर्व जखमींना तळेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे