Tue, Apr 23, 2019 13:56होमपेज › Pune › ‘कमळाबाई’ विरोधात सेनेच्या वाघाची ‘डरकाळी’

‘कमळाबाई’ विरोधात सेनेच्या वाघाची ‘डरकाळी’

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:58AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे

‘अंगावर आला तर शिंगावर घ्या’ अशी शिकवण  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आणि त्यांच्या त्याच संदेशावर राज्यात शिवसेनेची आक्रमक वाटचाल सुरू झाली. मित्रपक्ष म्हणून भाजपनेही लहान भावाची भूमिका पार पाडत साथ दिली; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून मोदी लाटेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपची सत्ता आली. तेव्हापासून राज्यासह शहरातही शिवसेनेला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. आगामी निवडणुकीत भाजप आपला प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यांच्याविरोधात लढ्यासाठी तयार राहण्याचा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पुण्यात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला शनिवारी उपस्थित राहिल्यानंतर ठाकरे यांनी हा आदेश दिला. या बैठकीला पिंपरी-चिंचडमधील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे शहरात कमळाबाईच्या विरोधात शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.  

भाजपने अनेक योजनांद्वारे लोकांची फसवणूक केली. त्यांच्या फसव्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्यांनी जाहिरातीचा मारा करत लोकांपुढे योजना मांडल्या. आपण गटप्रमुखांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून सत्य परिस्थिती मांडू. त्यासाठी शहरातील प्रत्येक बुथवर त्वरीत गटप्रमुख नेमा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या आढावा बैठकीनंतर शहरातील सेनेचे कार्यकर्तेही ‘चार्ज’ झाले आहेत. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शहरात भाजपविरोधात मोट बांधण्याची तयारी सेनेने सुरू केली आहे. शहरात गटप्रमुखांच्या येत्या आठ दिवसांत नेमणुका पूर्ण होतील असा विश्‍वास सेनेचे शहराध्यक्ष  व्यक्‍त करत आहेत. सध्या शहराध्यक्षापासून विभागप्रमुखांपर्यंतच्या नेमणुका झाल्या आहेत. येत्या आठवड्यात शाखाप्रमुख, त्यानंतर गटप्रमुखांच्या निवडी होणार आहेत. ऑगस्टपर्यंत पक्षाची संपूर्ण बांधणी करण्यात येणार, असल्याची माहिती शहराध्यक्षांनी दिली. 

शहरात सेनेच्या पदाधिकार्‍यांची निवड करताना तरूणांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी दिली आहे. ही निवड करताना पक्षातील ज्येष्ठांमध्ये नाराजी नाट्यही घडले. अनेक कार्यक्रमात नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांचा वावर कमी दिसत आहे; पक्षाच्या वर्धापन दिनालाही शहराप्रमुख योगेश बाबर यांनी काहीही कार्यक्रम घेतला नाही. मात्र; आमचा संसार सुखाचा सुरू असल्याचे सर्वच सांगत आहेत. 

शहरात भाजपच्या ताकदीपुढे आपला आवाज बुलंद करायचा असेल तर सेनेच्या नव्या व जुन्या पदाधिकार्‍यांना व शिवसैनिकांनी हातात हात घालून पुढे चालण्याची गरज आहे. त्यामुळे नव्यांच्या विरोधात जुन्या पदाधिकार्‍यांना आपली उघड नाराजी दाखविणे अडचणीचे ठरत आहे. येत्या निवडणुकीत भाजप विरोधात ‘शड्डु’ ठोकण्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शहरात पक्षाची बांधणी करून ‘कमळाबाई’च्या विरोधात सेनेचे वाघ आक्रमक डरकाळी फोडणार का? असा सवाल सध्या तरी उपस्थित होत आहे.

‘मावळा’त सेनेतर्फे बारणे व भाजपतर्फे जगताप यांच्यात लढत ?

आगामी निवडणुकीत भाजप आपला प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यांच्याविरोधात लढ्यासाठी तयार राहण्याचा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा  मतदारसंघात शिवसेनेतर्फ विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व भाजपतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत.  आता खा. बारणे परत ‘बाजी’ मारतात का आ. जगताप मागील पंचवार्षिकच्या पराभवाचा ‘वचपा’ काढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.