Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Pune › ‘लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा’ 

‘लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा’ 

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी 

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्याच्या जागेच्या मोबदल्यात संबंधित जागामालकांना टीडीआर देण्याच्या निर्णयावर शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. 

पालिकेमध्ये लोहगाव विमानतळाशेजारील जागेच्या भूसंपादनाबाबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीला खा. शिरोळे, आयुक्त कुणाल कुमार आदींसह जागा मालक उपस्थित होते. भूसंपादनापोटी देण्यात येणार्‍या टीडीआर स्वीकारण्यास जागा मालकांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी 15 एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ मंत्री व केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिले होते.  सर्व्हे नंबर 248 व 253 चे जागामालक यांनी योग्य टीडीआर पोटी ही जागा हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे सांगितले.

लोहगाव येथील सर्व्हे नंबर 237  व 248 व 253 या मिळकतींवर पार्किंग व ऑफिस कॉम्प्लेक्स व स्टोअरेज यार्डाचे आरक्षण दर्शविण्याची प्रक्रिया नगर विकासकडून सुरू करण्यात आली आहे. याकरिता नगर विकासने कार्यवाही सुरू केली आहे. खा. शिरोळे यांनी प्रस्तावाबाबतची पुढील बैठक वायू सेनेचे संबंधित अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.