Tue, Mar 26, 2019 20:18होमपेज › Pune › लोहगावचा कचर्‍याचा प्रश्‍न पेटला 

लोहगावचा कचर्‍याचा प्रश्‍न पेटला 

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:04AMयेरवडा : वार्ताहर

लोहगाव-वडगावशिंदे रस्त्यावरील हरणतळ्यानजीक कचरा टाकण्याचे नागरीकांनी  बंद केल्यामुळे लोहगावातील कचर्‍याचा प्रश्‍न पेटला आहे. कचर्‍याचा नियमित धूर, उग्र वास यामुळे त्रस्त झालेल्या आजू-बाजूच्या नागरीकांनी कचरा टाकण्याच्या ठिकाणाचे प्रवेशद्वारच दगड लावून बंद केले आहे. लोहगावचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे त्यामुळे महापालिकेसमोर लोहगावच्या कचर्‍याचा प्रश्‍नाबाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.

लोहगावची ग्रामपंचायत अस्तित्वात असताना वडगावशिंदे रस्त्यावरील हरणतळ्यानजीकच्या गावठाण जागेत कचरा डंपीग केला जात होता. महापालिकेत समावेश झाल्यापासून महापालिकेच्या वाहनांद्वारे देखील त्याच ठिकाणी कचरा डंपीग केला जात होता. मात्र कचरा डंपीग ठिकाणी पेटविला जात असल्यामुळे सर्वत्र धूराचे लोट पसरत असत. यामुळे परिसरात रहाणार्‍या नागरीकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. महापालिका देखील याचठिकाणी डंपीग करत असल्यामुळे परिसरात रहाणारे लेकव्हयू सोसायटी, ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल, एमएमआयटी तांत्रिक महाविद्यालय, कासेगाव इन्सिटयूट, भारती विद्यापीठ शाळा, कावेरी स्कूल यासह हरणतळे, वडगावशिंदे परिसरात रहाणार्‍या नागरीकांना कचर्‍याचा प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  

यामुळे संतप्त झालेले हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे, गणेश खांदवे यासह परिसरातील रहिवाशांनी कचरा घेवून येणार्‍या गाड्या अडवून कचरा टाकण्याचे बंद करावे अशी मागणी केली. नागरिकांनी कचरा डंपिग ठिकाणाचे प्रवेशद्वार बंद करून याठिकाणी मोठमोठे दगड लावले आहेत. कायमस्वरूपी याठिकाणी कचरा टाकण्याचे बंद करावे अन्यथा यापुढे देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी महापालिकेला दिला आहे.

कचरा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी घनकचरा विभागाचे अधिकारी सुरेश जगताप, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त वसंत पाटील, नगरसेवक बापूराव कर्णे-गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जगताप यांनी कचरा डंपीग केला जात असलेल्या ठिकाणाला भेट दिली. अधिकार्‍यांनी तेथील नागरीकांशी चर्चा करून नागरीकांना विंनती केली. पत्र्याचे शेड उभारून कचरा वगीर्र्करण करण्यात येईल त्यानंतरचा कचरा कचरा रॅम्पवर पाठविण्यात येईल असे अधिकारी सुरेश जगताप यांनी सांगितले. मात्र नागरीकांनी याला देखील विरोध केल्यामुळे लोहगावच्या कचर्‍याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. कचरा उचलण्यासाठी वाहनांची संख्या देखील वाढविण्याची गरज आहे. वाहनांची संख्या वाढवावी असे अर्जुन जगताप यांनी सांगितले.