Sun, Mar 24, 2019 16:50होमपेज › Pune › चाकणमध्ये शंभर एकरात लॉजिस्टीक्स  पार्क

चाकणमध्ये शंभर एकरात लॉजिस्टीक्स  पार्क

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:34AMपुणे : दिगंबर दराडे

औद्योगिक हब असलेल्या चाकणमध्ये तब्बल शंभर एकरात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. याकरिता सरबाणा जुराँग कंपनीकडून डीपीआर तयार करण्यात येणार असून तब्बल पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक या पार्कसाठी सिंगापूरकंपनीकडून करण्यात येणार आहे.  

खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आणि जागतिक स्तरावर ‘ऑटो हब’ म्हणून उदयास आलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्राचा कायपालट करण्याचे धोरण पुणे महानगर प्राधिकरणाकडून आखण्यात आले आहे. चाकण येथे तब्बल एमआयडीसीच्या शंभर एकर जागेवर हे पार्क उभारण्यात येणार आहे. याकरिता सिंगापूरच्या कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करार केला आहे. या करारवर फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योगमंत्री ईश्‍वरन यांनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. चाकण येथील जागा तब्बल ऐंशी ते शंभरवर्षाकरिता भाडेकरारावर घेण्यात येणार आहे.  या पार्कचा फायदा चाकण परिसरातील तब्बल तीनशे कंपन्यांना होणार आहे. 

..कसे असेल लॉजिस्टीक्स पार्क

परराज्यातून,परदेशातून आलेला मालकंपनीत थेट न जाता या पार्कमध्ये येईल. या ठिकाणावरुन चाकण परिसरातील कंपन्यांना या मालाचे वाटप होईल. हा माल पोहचवत असताना पारंपारिक पध्दतीचा वापर न करता अत्याधुनिक सिस्टमचा वापर करण्यात येईल. या ठिकाणी मोठमोठी गोदामे बांधण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे. कोणत्याही ठिकाणी कोणती मशनरी जोडायची, कुठे ऑफीस असणार, याचं नियोजन सिंगापूरची कंपनी करणार आहे. याच बरोबर ई कॉमर्स गोदामे देखील या ठिकाणी उभी करण्याचा मानस आहे. आधुनिकपध्दतीने प्रतवारी, पँकिग तसेच ऑटोम्याटिकपध्दतीने माल उतरवला जाईल आणि गाडीत भरला जाणार आहे.  ऑटोमोबाइल, इंजिनिअरिंग कन्झ्युरमर गुडस आणि इ कॉमर्ससारख्या विविध उद्योगक्षेत्रामधील कंपन्यां सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच कंपनीतर्फे वेअरहाऊस व्यवस्थापन वाहतूक, वेअरहाऊस व्यवस्थापन यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापन याव्दारे स्मूथ डिलिव्हरीची खात्री दिली जाणार आहे. 

...पीएमआरडीएचे नवीन आराखडे

ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्यांनी आपापले प्रकल्प तळेगाव-चाकण या औद्योगिक पट्ट्यामध्ये प्रस्थापित केले आहेत.   चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा उद्योजगतेच्या दृष्टिकोनातून पालटत आहेच; शिवाय पिंपरी-चिंचवडप्रमाणे ‘ट्विन सिटी’ म्हणूनही उदयास येतोय. औद्योगिक नियोजनासाठी हा भाग उत्तम आहे. याच्या विकासाला अजून चालना देण्यासाठी पीएमआरडीए नव नवीन आराखडे तयार करीत आहे. एखाद्या भागाचा प्रत्येक क्षेत्रात जोमाने होणारा विकास, प्रामुख्याने उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाइलमध्ये प्रगती वेगाने होत आहे. यामुळे या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्कची गरज निर्माण झाली आहे.  विविध कंपन्यांचा विकासच या भागाला घरांची मागणी वाढून द्यायला कारणीभूत ठरतोय. या भागाची होणारी प्रगती व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांना आकर्षित करते आहे, असे पुणे महानगर प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.