Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Pune › ब्लॉकमुळे लोकल प्रवासी नाराज

ब्लॉकमुळे लोकल प्रवासी नाराज

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान धावणार्‍या दुपारच्या लोकल 1 जून ते 30 जूनदरम्यान महिनाभर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये या मार्गावर लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी चार वेळा ब्लॉक घेण्यात आले आहेत. वारंवार घेण्यात येणार्‍या ब्लॉकमुळे लोकल सेवा रद्द केली जात असून, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसतो. इतक्या वेळा ब्लॉक घेऊनदेखील काम वेळेत पूर्ण होत नसल्याने पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येतो, असे पाहणीतून दिसून आले. 

दरम्यान, नेमकी कोणती कामे ब्लॉकवेळी करण्यात येतात, याची तपशीलवार माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. दुपारी 12.15 ते 3.40 दरम्यान धावणार्‍या सहा लोकल पुढील महिनाभर धावणार नसल्याने नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे प्रचंड हाल होणार आहेत. लोकलचा पर्याय सर्वात जलद व स्वस्त असल्याने पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान प्रवाशांची पहिली पसंती लोकललाच असते. परंतु, लोकलच रद्द केल्याने प्रवाशांना एसटी, पीएमपीचा महागडा पर्याय नाईलाजाने निवडावा लागणार आहे. 

पुणे-लोणावळादरम्यान सध्या लोकलच्या 40 फेर्‍या होत असून पुणे-तळेगावदरम्यान 4 फेर्‍या होतात. गेल्या दशकभरापासून रेक व फेर्‍यांची संख्या वाढली नसून प्रवाशांना तुडुंब गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. त्यांची ससेहोलपट सुरूच असून सद्यःस्थितीत दर तासाला दोन्ही बाजूंंकडून लोकल सोडली जात आहे. दर पाच मिनिटांनी ती सोडली जावी, अशी मागणी प्रवासी गेली कित्येक वर्ष करत आहेत. परंतु, अद्यापही त्यांच्या मागणीला यश आलेले नाही. मध्यंतरी मुंबईतून सिमेन्सचे रेक पुण्यात दाखल झाले. मात्र, जुने रेक काढून टाकल्याने रेकची संख्या पूर्वीएवढी चारच राहिली आहे. दरम्यान, वाढत्या नागरिकरणामुळे पुण्याच्या आजूबाजूला अनेक गावे विकसित झाली. परंतु नोकरीनिमित्त पुण्यात दररोज यावे लागत असल्याकारणाने लोकलचाच एकमेव आधार नोकरदारांना असतो. बहुतांश जण शिफ्टमध्ये काम करत असून अशांना दुपारच्या लोकल सोयीस्कर ठरत होत्या. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याने त्यांची काही दिवस गैरसोय होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.