Sun, May 26, 2019 14:39होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’साठी स्थानिक सल्लागार समिती

‘स्मार्ट सिटी’साठी स्थानिक सल्लागार समिती

Published On: Mar 07 2018 2:11AM | Last Updated: Mar 07 2018 2:01AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’मध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून शहरपातळीवर स्थानिक सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये शहरातील खासदार, आमदार, महापौरांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तरुण यांचा समावेश असणार आहे. 

‘स्मार्ट सिटी’चे कामकाज प्रगतिपथावर आहे. ‘एरिया बेस डेव्हल्पमेंट’ व ‘पॅन सिटी’अंतर्गत करावयाचे विविध प्रकल्पांचे आराखडे तयार करण्याचे काम सल्लागार एजन्सीमार्फत सुरू आहे. महिनाभरात प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. 

‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत शहरातील नागरिकांचा सहभाग असावा म्हणून शहरपातळीवर सल्लागार समिती नेमण्याची अट आहे. त्यानुसार पालिका सल्लागार समिती स्थापन करणार आहे. त्यामध्ये शहरातील खासदार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापौर नितीन काळजे, ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, 1 तरुण, 1 तांत्रिक अधिकारी यांचा समितीमध्ये समावेश असणार आहेत. तसेच, नोंदणीकृत हौसिंग सोसायटी महासंघ, करदाता महासंघ, झोपडपट्टी महासंघ किंवा स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांमधून केवळ एक सदस्य समितीमध्ये निवडला जाणार आहे. समितीची दर महिन्यास बैठक घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आलेले प्रस्ताव, सल्ल्यानुसार ‘स्मार्ट सिटी’त विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प व योजना राबविल्या जाणार आहेत. सदर समिती निवडीसंदर्भात ‘स्मार्ट सिटी’च्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार आहे.

‘स्मार्ट सिटी’च्या कामकाजाबाबत माहिती देताना ‘स्मार्ट सिटी’चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण यांनी सांगितले की, येत्या शुक्रवारी (दि.9) सकाळी दहाला ‘स्मार्ट सिटी’च्या समन्वयक समितीची बैठक होणार आहे. त्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ‘स्मार्ट सिटी’तील सर्व शहराच्या अधिकार्‍यांची ‘स्मार्ट सिटी’ अभियानाचे केंद्रीय अधिकारी समीर शर्मा यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसच्या माध्यमातून बैठक 15 तारखेला होणार आहे. या महिनाअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’साठी केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता आहे.