Thu, Jan 17, 2019 17:40होमपेज › Pune › प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये चालते ‘लॉबिंग’

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये चालते ‘लॉबिंग’

Published On: Jun 13 2018 1:54AM | Last Updated: Jun 13 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या होताना ‘लॉबिंग’ होऊ नये. म्हणून कायदा करण्यात आला आहे. मात्र, अनेक अधिकारी हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतात. यावरूनच प्रशासकीय बदल्यांमध्ये ‘लॉबिंग’ चालत असल्याचे स्पष्ट होते. सर्वच अधिकारी स्वार्थासाठी बदली करून घेतात असे नाही. काही अधिकारी समाजसेवा करण्यासाठी सुध्दा स्वत:च्या बदल्या करून घेतात, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले.

अमृतवेल फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित अनौपचारिक गप्पांमध्ये झगडे बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, अमृतवेल फाऊंडेशनचे धर्मेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी झगडे म्हणाले, प्रशासनाच्या अंतर्गत काय सुरू आहे, याबाबी समाजासमोर आणायला हव्यात. शासनात नोकरशाही असल्याशिवाय काम करताच येत नाही. राजा महाराजांच्या काळापासून नोकरशाही सुरू आहे. 

शासनाच्या सर्वोच्च ब्युरोक्रसीमध्ये युपीएससी निर्मित नोकरदारांची भरती शासनात केली जाते. आता खासगी कंपनीत काम करणार्‍यांना युपीएससी परिक्षा न देता प्रत्यक्ष प्रशासकीय कामात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यांना शासनाने काही नियम लागू करावेत. नोकरीच्या काळात या अधिकार्‍यांनी खासगी क्षेत्राशी संबध ठेवता कामा नये. तसे करणार्‍यांवर कडक कारवाई व्हायला हवी, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.

इमारत बांधकाम परवानगी, नाले सफाई  ही कामे अधिकार्‍यांमार्फत कसे चालते, हे सांगायला नको. यावर प्रसार माध्यमे आणि नागरिकांनी लक्ष द्यायला हवे. सातत्याने लक्ष दिल्यास प्रशासनाच्या कामकाजात भविष्यात नक्कीच बदल होतील. प्रशासन जर व्यवस्थित चालत नसेल, तर घटनेत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे त्यांचे कामकाज पाहण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती देखिल असायला हवी. सचिवांची जबाबदारी आहे कि, तहसिलदार, तलाठी यांचे कामकाज कसे सुरू आहे ते पहाणे, ते व्यवस्थित सुरू नसेल तर त्यांना शिक्षा करण्याची सुध्दा त्यांचीच जबाबदारी आहे, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.