Tue, Jul 23, 2019 11:37होमपेज › Pune › आयुक्तांच्या नियुक्तीची प्रतीक्षा; आयुक्तालयात वर्णी लागावी म्हणून धडपड

पोलिस आयुक्तालयासाठी ‘लॉबिंग’

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:24AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र आयुक्‍तालय सुुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरात हालचाली सुरू आहेत. मे महिन्यात नियमाप्रमाणे होणार्‍या बदल्यांसोबत स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी अचानक 14 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामुळे या आयुक्तालयात आपली वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ अधिकारी ते कर्मचार्‍यांनी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. तर पोलिस आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने नव्याने आदेश झालेल्या पोलिस निरीक्षकांना काहीच करता येणार नाही. 

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी  राज्यातील विविध ठिकाणांहून 14 निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये यशवंत नामदेव गवारी, राजेंद्र जयंत निकाळजे, भानुदास आण्णासाहेब जाधव, दिलीप तुकाराम भोसले, सुनील रंभाजी दहिफळे, संजय वामनराव निकम, पांडुरंग बाबासाहेब गोफणे, सतीश विठ्ठल पवार, सुनील विष्णू पवार, सुधाकर पंडीतराव काटे, श्रीराम बळीराम पौड, अजय विनायकराव जोगदंड, टि. वाय. मुजावर आणि प्रदीप उत्‍तम लोंढे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकल्यानंतर आता 15 ऑगस्टला आयुक्तालय सुरू होणार असल्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानुसार 14 निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे नक्कीच 15 ऑगस्टपासून कामकाज सुरु होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस यांच्याकडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुसर्‍या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिसर्‍या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत.

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे शहर पोलिसांच्या झोन तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, तर झोन चारमधील दिघी पोलिस ठाणे; तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड या पोलिस ठाण्याच्या समावेश होणार आहे. यामध्ये निगडी पोलिस ठाणे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यातील काही भाग कमी करून तयार होणार्‍या चिखली पोलिस ठाण्याचाही समावेश होणार आहे. याव्यतिरिक्त गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, पासपोर्ट विभाग, मुख्यालय, मोटार परिवहन विभाग (एमटी), बिनतारी संदेश विभाग (वायरलेस), शीघ्रकृती दल (क्युआरटी), पोलिस मुख्यालय (हेडकॉर्टर), पोलिस दवाखाना, मंत्रालयीन कर्मचारी व वर्ग 4 (अस्थापना व क्लास 4), बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस) या अकार्यकारी विभागांचा देखील समावेश असणार आहे. 

लोकप्रतिनिधींच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात

आता पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त,  सहाय्यक पोलिस आयुक्त, निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या बाकी आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे असलेले मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास दिले जाणार आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही ठिकाणच्या अधिकार्‍यांनी ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, त्यांचे मध्यस्त, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. या सगळ्या ‘लॉबिंग’ मध्ये कोणाची वर्णी लागते हे लवकरच समजेल.