Thu, Jul 18, 2019 17:10होमपेज › Pune › आमदार लांडगे यांचे जाधव यांच्यासाठी जोरदार लॉबिंग 

आमदार लांडगे यांचे जाधव यांच्यासाठी जोरदार लॉबिंग 

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:27AMपिंपरी  : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर महापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्यासाठी माळी समाजाला पुढे करत जोरदार लॉबिंग केले आहे.  मात्र, महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आणून त्यांची वर्णी लावलेल्या आ.  लक्ष्मण जगताप यांच्या खेळयांची लांडगे समर्थकांना काहीशी भीती आहे.  ब्लॅक हॉर्सप्रमाणे ते आपल्या समर्थकाचे नाव महापौर पदासाठी पुढे आणू शकतात.  

सन 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सत्तांतर झाले अन भाजपची सत्ता आली.  महापौरपदासाठी आ.  जगताप समर्थक नामदेव ढाके यांचे नाव पुढे होते.  मात्र प्रसंगी बंड करण्याचा इशारा देऊन आ.  लांडगे यांनी आपले समर्थक नितीन काळजे यांची महापौरपदी वर्णी लावून घेतली. सर्वांना संधी मिळावी या तत्वानुसार 16 महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर, उपमहापौर यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले. त्यांनी राजीनामे दिल्याने  दि. 4 ऑगस्ट रोजी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड केली जाणार आहे.  त्यासाठी येत्या मंगळवार दि. 31 रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत .त्यासाठी गटातटांचे लॉबिंग सुरू आहे.  

महापौरपदासाठी आ.   लांडगे गटाचे राहुल जाधव, संतोष लोंढे तर आ जगताप गटाचे शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, शीतल शिंदे  यांची नावे चर्चेत आहेत .आ.  लांडगे यांनी माळी समाजाला पुढे करत राहुल जाधव यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.  अखिल माळी समाजाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन  महापौरपदी माळी समाजातील पुरुष नगरसेवकास संधी देण्याची मागणी केली. 

शहरात माळी समाजाची लोकसंख्या दीड दोन लाख आहे.  विधानसभेला तसेच पालिका निवडणुकीत माळी समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे.  आ.   महेश लांडगे व आ.  लक्ष्मण जगताप यांच्या विजयात माळी समाजाचे मोठे योगदान आहे. राष्ट्रवादीने आजवर अनिता फरांदे, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांना महापौरपदी संधी दिली आहे. भाजपची सत्ता आल्यावर ओबीसीसाठी आरक्षित जागेवर माळी समाजाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.  मात्र कुणबीमधून नितीन काळजे यांना संधी दिली गेली. त्यावेळी आमचीही चूक झाली आम्ही गाफील राहिलो स्थायी समिती अध्यक्षपद निवडीतही माळी समाजाला डावलले आता काळजे यांनी राजीनामा दिल्यावर तरी महापौरपदी माळी समाजाला संधी द्यावी, अन्यथा भाजपला येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. महापौरपदी माळी समाजातील पुरुष नगरसेवकास संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. 

यावरून राहुल जाधव व संतोष लोंढे यांच्यासाठी माळी समाजाचे लॉबिंग चालल्याचे स्पष्ट झाले. मात्र एकीकडे आ.  लांडगे आपल्या सोंगट्या पुढे सरकवत असताना दुसरीकडे आ.  जगताप ऐनवेळी काय खेळया करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, शीतल शिंदे ,विलास मडीगेरी यांची नावे स्पर्धेत असताना आ जगताप यांनी आपल्या समर्थक ममता गायकवाड यांची ऐनवेळी वर्णी लावली होती.  यावेळीही ते असा काही चमत्कार घडवणार का? याबाबत उत्सुकता आहे 

ओबीसीचा मुद्दा वार्‍यावर

माळी समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कोणत्याही ओबीसी व्यक्तीला महापौरपदी संधी मिळाली तर आपण समाधान मानणार का? असे विचारले असता माळी समाजाला महापौरपदी संधी मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे समाजाच्या नेत्यांनी सांगितले.  त्यामुळे माळी समाजाने अन्य ओबीसींना वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे.

आ. जगतापांचा उमेदवार कोण?

आ. महेश लांडगे हे राहुल जाधव यांच्यासाठी लॉबिंग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मात्र शत्रूघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम यापैकी जगताप कोणासाठी प्रयत्न करणार,करत होते.  हे महापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल.