Sun, May 26, 2019 11:11होमपेज › Pune › ससूनमध्ये युवकाने दिले चौघांना जीवनदान

ससूनमध्ये युवकाने दिले चौघांना जीवनदान

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयात ब्रेन डेड झालेल्या 15 वर्षीय युवकाने केलेल्या अवयवदानामुळे, चार रुग्णांचे प्राण वाचले आहेत. या रुग्णाचे हृदय चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलला, यकृत नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात, एक मूत्रपिंड दीनानाथ रुग्णालयात तर दुसरे मूत्रपिंड ससूनमधील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले आहे. ससूनमधील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी, सोमवारी पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान हे अवयवदान व प्रत्यारोपण मोहीम यशस्वी केली.  

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा रहिवासी असलेल्या 15 वर्षीय युवकाने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. तो 3 मे रोजी मांडवगण येथे आजोळीत दुचाकीने जात असताना त्याने उतारावर अचानक  ब्रेक लावले व यामध्ये गाडी घसरून पडून, डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथून दुसर्‍या दिवशी 4 मे रोजी त्याला शहरातील रुबी हॉल क्‍लिनिक व त्याच दिवशी दुपारी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाच मे रोजी त्याला डॉक्टरांनी विविध तपासण्या करून, ब्रेन डेड घोषित केले. 

या वेळी ससूनच्या डॉक्टरांसमोर अवयवदानासाठी त्याच्या पालकांचे समुपदेशन करणे हे आव्हान होते. पण, येथील डॉक्टर व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांनी त्याचे वडील, भाऊ यांचे समुदेशन केले. त्यांनी संमती दिल्यांनतर ही बाब ‘पुणे अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती’ (झेडटीसीसी) ला कळविले. समितीच्या प्रतीक्षा यादीनुसार ह्रदय चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलला देण्यात आले. ते पहाटे येथून तीन वाजता लोहगाव विमानतळावर ग्रीन कॉरिडॉरने गेले व तेथून ते विमानाने चेन्नईला रवाना झाले.  त्याचे ह्रदय काढण्यासाठी चेन्नईतील डॉक्टरांचे पथक आले होते. 

अवयवाचे दान करण्यासाठी ब्रेन डेड रुग्णाच्या आई व वडील या दोघांची परवानगी लागते. वडील ससूनमध्ये असल्याने त्यांची सही घेतली. पण, आईची सही घेण्यासाठी ससूनचे मुख्य वैद्यकीय समाजसेवक एम. बी. शेळके, अर्जुन राठोड हे रुग्णवाहिका घेऊन रात्री रुग्णाच्या घरी गेले आणि त्यांच्या आईची सही घेतली. नंतरच त्याचे अवयवदान झाले. यावरून येथील स्टाफने किती मेहनत घेतली हे दिसून येते.

युवकाचे वडील हवालदार

ब्रेन डेड झालेल्या युवकाचे वडील नगर पोलिस दलात हवालदार आहेत तर आई गृहिणी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्य आहेत. त्यापैकी हा युवक मोठा होता. 

या डॉक्टरांनी घेतले परिश्रम

ससूनमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले  यांच्या  मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अमित भंगले, डॉ. अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. धनंजय कामेरकर, भूलतज्ज्ञ डॉ. माया जामकर, डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश टाटिया, डॉ. इब्राहिम अन्सारी यांच्या पथकाने केली. त्यांना एम. बी. शेळके, अर्जुन राठोड व राजश्री कोरके यांनी सहाय्य केले. तर परिचारिका रुक्साना सय्यद व डायलिसिस विभागातील स्टाफचे सहकार्य लाभले. 

ससूनमधील तरुणीला जीवनदान

मूळच्या पुण्यातील रहिवासी असलेल्या व ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. तिला गेल्या अडीच वर्षांपासून मूत्रपिंडाचा विकार झाला होता. सध्या ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 12 रुग्ण वेटिंगवर आहेत.