Sun, Apr 21, 2019 03:49होमपेज › Pune › आता वारीचे थेट प्रेक्षपण मोबाईलवर

आता वारीचे थेट प्रेक्षपण मोबाईलवर

Published On: Jul 05 2018 2:06AM | Last Updated: Jul 05 2018 2:04AMपुणे : प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रेक्षपण वारकर्‍यांना ‘याची देही, याची डोळा’ मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८ मोबाईल ऍप’ची निर्मिती केली आहे. ऍपवर पालखी सोहळ्याचे मुक्काम, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा, विधुत सेवा, पाण्याची सोय यासह विविध माहिती वारकर्‍यांना एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे.

पालखी सोहळ्यात सहभाग होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. मोबाईलवर पालखी सोहळ्याची माहिती वारकर्‍यांना तातडीने देण्यासाठी ‘आषाढी वारी २०१८ ऍप’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ऍप’द्वारे दोन्ही पालखी सोहळ्यांचे मार्गक्रमण कळण्यास मदत होणार आहे, तर सोहळा प्रमुख, पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा, अन्नधान्य पुरवठा व वितरण, महानगरपालिका व नगरपालिका, विद्युतसेवा, पालखी तळ समन्वय समितीची माहिती मिळणार आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरातील थेट प्रेक्षपण पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था, चुकलेल्या व्यक्तींची माहिती ऍपवर पाहता येणार आहे.

वारकर्‍यांना अत्यावश्यक असणार्‍या वैद्यकीय सेवेची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऍपची मदत होणार आहे. पालखी सोहळ्यातील वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्यकेंद्र, खासगी वैद्यकीय डॉक्टरांचे मोबाईल क्रमांकासहित दवाखान्यांचे पत्ते उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच स्वयंपाकाच्या दृष्ठीने आवश्यक पाण्याची व्यवस्था, टँकर भरण्याची केंद्रे, अन्नधान्य पुरवठा अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक ऍपवर नोंदविण्यात आले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर माहिती मिळणार असल्यामुळे वारकर्‍यांची आषाढी वारी टॅक्नोसॅव्ही झाली आहे. 

‘आषाढी वारी २०१८’ हे ऍप करा डाऊनलोड

दोन्ही पालखी सोहळ्यांचे अपडेट मिळविण्यासाठी वारकर्‍यांनी गुगल प्ले स्टोअरद्वारे ‘आषाढी वारी २०१८’ हे ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन वारीचे समन्वयक उदयसिंह भोसले यांनी केले आहे. ऍपद्वारे वारकर्‍यांना समस्या, तक्रार करता येणार आहे. त्याची तात्काळ दखल प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.

वारकर्‍यांच्या दिमतीला सात हजार अधिकारी, कर्मचारी

संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना सेवासुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागातील तब्बल सात हजारांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत.