Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Pune › ‘केईएम’मध्ये शस्त्रक्रियेसाठी नेताना चिमुरडीचा मृत्यू

‘केईएम’मध्ये शस्त्रक्रियेसाठी नेताना चिमुरडीचा मृत्यू

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटमध्ये हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या बालिकेचा गुरुवारी सकाळी ‘आयसीयू’मधून शस्त्रक्रिया करण्यासाठी नेत असताना मृत्यू झाला. हा मृत्यू हॉस्पिटलच्या स्टाफकडून ऑक्सिजन यंत्रणा बदलताना हलगर्जीपणा केल्याने झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर बाळाचा मृत्यू हा हलगर्जीपणामुळे नाही, तर हृदयविकाराने झाला असल्याचे हॉस्पिटलच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

गौतमी विनायक चौधरी (वय चार महिने, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील विनायक चौधरी यांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे तसेच जवळील समर्थ पोलिसांकडे तक्रार केली आहे. विनायक चौधरी हे पेंटिंगच्या दुकानात काम करतात. 

गौतमी ही त्यांची पहिलीच एकुलती एक मुलगी आहे. तिला ‘टीएपीव्हीसी’ हा जन्मजात हृदयविकार होता. या हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्याचे त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी चार मे रोजी दाखल केले होते. 

त्यासाठी हॉस्पिटलने अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता. कुटुंबीयांनी जवळपास एक लाख 86 हजार रुपये जमा केले. तसेच जोपर्यंत पूर्ण पैसे जमा करत नाही तोपर्यंत शस्त्रक्रियेस हात लावणार नसल्याचे सांगितल्याने त्यांनी महापालिकेतील शहरी गरीब योजनेतून एक लाख रुपये निधी मिळण्यासाठी दाखला आणला. यानंतरच डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्यासाठी घेतले. अशा प्रकारे मानसिक त्रास दिल्याने आणि पैशांसाठी शस्त्रक्रिया उशिरा केल्याचा आरोपही गौतमीचे वडील चौधरी आणि त्यांचे जवळील मोहसीन नगरवाला तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बाणखेले यांनी या वेळी केला. 

गुरुवारी सकाळी ऑपरेशन करायचे ठरले होते. त्यानुसार गौतमीला सकाळी साडेसात वाजता हृदयरोग शस्त्रक्रिया करणारे डॉ. श्रीनिवास किणी हे आले होते. त्यांनी गौतमीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला नेत असताना तिचा मृृत्यू झाला. त्यावेळी गौतमीच्या आजी शोभा चौधरी सोबत होत्या. गौतमीचा ऑक्सिजन काढला व तो परत लावताना तिचा श्‍वास कोंडला होता आणि त्यामुळे तिने डोळे पांढरे केले होते. त्यानंतर त्यांनी गौतमीला शस्त्रक्रियागृहात नेले आणि परत ‘आयसीयू’मध्ये आणले. त्यावेळी मला डॉक्टरांनी औषध आणायला पाठविले. परत आले असता तिचा साडेसातच्या दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती शोभा चौधरी यांनी दिली. 

याबाबत केईएम हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रशासनाचे प्रमुख डॉ. व्ही. येमूल यांना विचारले असता त्यांनी मुलीचा मृत्यू ऑक्सिजन यंत्रणा काढताना निष्काळजीपणा झाल्याचा दावा फे टाळून लावला. तसेच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले. गौतमी ही ‘आयसीयू’मधील ‘हाय फ्रिक्‍वेन्सी ऑसिलेटर’ (ऑक्सिजन प्रणाली) यावर होती. तिला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाताना ‘हाय फलो नासाल कॅन्युअला’ (रुग्णाबरोबर घेऊन जाता येणारी ऑक्सिजन प्रणाली) याचा वापर केला आहे. पण तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे. दरम्यान, सर्व योग्य ते उपचार आम्ही केले आहेत, असे डॉ. येमूल म्हणाले.