होमपेज › Pune › नागरिकांमध्ये उपचार साक्षरता महत्वाची

नागरिकांमध्ये उपचार साक्षरता महत्वाची

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 12:36AM

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

सध्याच्या काळात रुग्णांवर कमीत कमी पैशांत चांगले उपचार करून घेण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. यामध्ये धर्मादाय रुग्णालये, महात्मा फुले जन आरोग्य योजना असलेले रुग्णालये, मोठे सरकारी रुग्णालये निवडणे आवश्यक आहे. रुग्णांनी घाबरून न जाता याबाबत चौकशी करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. 

ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनी कोणत्या रुग्णालयांत जायचे याची निवड करायला हवी. सर्वप्रथम रुग्णाला उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल करणार आहे तो धर्मादाय आहे का, तेथे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे का याची चौकशी करणे आवशक आहे. कारण धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांसाठी 20 टक्के बेड राखीव असतात. त्याची चौकशी संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय समाजसेवकांकडे करता येते. रुग्ण दाखल करतानाच रुग्ण गरीब घटकातील असल्याचे सांगावे, कारण त्यानुसार रुग्णालय प्रशासन बिल आकारणी करते. 

सध्या रुग्णांच्या सोईसाठी धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावरही जिल्हानिहाय किती रुग्णालये धर्मादाय आहेत याची आणि तेथे गरीब रुग्णांसाठी किती बेड रिकामे आहेत याची माहिती मिळते. 

इंटरनेट कनेक्शन असलेल्या मोबाईलवरूनही ही माहिती पाहता येते. धर्मादायच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मराठी भाषा निवडावी आणि त्यावरील ‘हॉस्पिटल तपशील पहा’ या लिंकवर क्लिक करावे. यानंतर जिल्हा निवडून शोध घेतल्यास तेथे किती रुग्णालये आहेत हे दिसते. त्यामध्ये सदर रुग्णालयाचे नाव, पत्ता, बेड उपलब्धता, समासेवकाचे नाव व संपर्क आदी माहिती मिळते. त्यावरून संपर्क करूनही रुग्णाला दाखल करता येते.  

जर त्यांनी नकार दिला तर त्यांची तक्रार संबंधित धर्मादाय कार्यालयाकडे करावी. मात्र त्यासाठी तो रुग्ण खरोखर गरीब असणे आवश्यक आहे, अशी माहिती धर्मादाय कार्यालयाने दिली.