Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Pune › २५ टक्के राखीव जागा असलेल्या शाळांची यादी आता संकेतस्थळावर

२५ टक्के राखीव जागा असलेल्या शाळांची यादी आता संकेतस्थळावर

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी 

बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के राखीव जागा असलेल्या शाळांची यादी आता वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी  घेतला आहे. 

शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. दरम्यान, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेत 2018-19 च्या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा करण्याच्या  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी पासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. 

त्यानुसार अशा सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय, तालुकानिहाय यादी आता शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शासनाच्या क्रीडा विभागावरही ही यादी अपलोड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या दोन वर्षापासून आम आदमी पार्टीद्वारे यादी वेबसाईटवर अपलोड करण्याची मागणी करण्यात येत होती. 

याबाबतच्या सुनावणीत अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळांची यादी वेबसाइटवर टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.  दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्यापही राज्यातील सुमारे 50 हजार जागा रिक्त आहेत. राज्यात एकूण 8 हजार 976 शाळांमध्ये मिळून 1 लाख 26 हजार 165 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ 72 हजार 5 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अद्यापही राज्यातील सुमारे 50 हजार जागा रिक्त आहेत. आरटीई प्रवेशासाठी एकूण 1 लाख 98 हजार 961 अर्ज आले आहेत.