Wed, May 22, 2019 06:29होमपेज › Pune › पार्कींग ठेकेदारच मागतात परवाना आणि कागदपत्रे!

पार्कींग ठेकेदारच मागतात परवाना आणि कागदपत्रे!

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:24AMपुणे : हिरा सरवदे 

नो-पार्कींगमधील वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना असताना, पार्कींगचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडूनच हे अधिकार वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर रेल्वे स्थानक परिसरात सुरू आहे. स्टेशन बाहेर लावलेल्या दुचाकींना साखळी लावून दंड वसुल केला जात आहे. हा अधिकार पोलिसांनी (आरपीएफ) दिल्याचे संबंधीत ठेकेदाराकडून सांगण्यात येते. यासंदर्भात लेखी तक्रार आल्यास कारवाई करू, असे स्थानक प्रमूख म्हणतात. 

या ठिकाणी पार्किंगचा ठेका 2017 ते 2020 या कालावधीसाठी एका खासगी ठेकेदाराला देण्यात आला आहे. प्रवेशद्वाराशेजारी गाड्या पार्किंग केल्या जाऊ नयेत, यासाठी दोन्ही बाजूस 40 ते 45 फूट लांब पदपथ तयार करून, त्याला संरक्षण कठडा बांधण्यात आला आहे. त्यामुळे तेथे वाहने पार्क करता येत नाहीत. सोलापूरला जाण्यासाठी सकाळी ‘पॅसेंजर’ असल्याने अनेकजण नातेवाईकांना सोडण्यासाठी नाईट ड्रेसवर येतात. अशा वेळी दुचाकी, पे अ‍ॅन्ड पार्कच्या परीसरापासून दूर लावून स्थांनकात जातात. याचवेळी ठेकेदाराचे काही लोक या दुचाकींना साखळी लावतात. परत आल्यानंतर साखळीसंबंधी तेथे विचारणा करताच, नो पार्कींगमध्ये गाडी लावल्याने साखळी लावल्याचे सांगितले जाते. पोलिसांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, अशी विचारणा केल्यास, येथील तीन-चार लोक, संबंधिताच्या अंगावर धावून येतात. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता, रेल्वे पोलिसांनी दंड वसूलीचे अधिकार दिले आहेत. गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली जात नाही, असे त्यांनी सांगितले.

लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई

स्थानकाच्या प्रवेशद्वाजवळील जागेखेरीज रस्त्यावरील पार्कींगचे पैसे घेण्याचा अधिकार दिलेला नाही. दुचाकीधारकांची लेखी तक्रार आल्यास कारवाई करण्यासंबंधी विचार केला जाईल, असे स्थानक व्यवस्थाकांनी सांगितले. 

परवाना व कागदपत्रेही मागितली!

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून 40 ते 50 फुट दूर रस्त्यावर पाच दुचाकी आणि एका रिक्षाला बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास साखळी लावण्यात आली होती. ही सर्व मंडळी नातेवाईकांना सोडण्यास आली होती. यापैकी तीन दुचाकीधारक नाईट ड्रेसवर होते. त्यांना पार्कींगचे पैसे घेणार्‍याने नो पार्कींगमध्ये गाडी लावल्याचे म्हणत, एकाकडे परवाना आणि कागदपत्रांची मागणी केली. नाईट ड्रेस असल्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांची भिती दाखवून घरून दंडाचे पैसे आणि लायसन मागविण्यास सांगण्यात आले. यावेळी सर्वजण पाऊणतास ताटकळक दुचाकी सोडण्याची विणवणी करत होते.