Sun, Jul 21, 2019 09:59होमपेज › Pune › पोलिसांचा वचक कमी; गुन्हेगारी वाढली

पोलिसांचा वचक कमी; गुन्हेगारी वाढली

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 11:51PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी 2017 वर्ष हे गुन्हेगारीच्या दृष्टीने धोक्याच्या वळणावर नेऊन ठेवणारे ठरले. वर्षभरात शहरात तब्बल 39 खून पडले. याचबरोबर गोळीबार, मारहाण, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, अपहरण, महिला अत्याचार, राजकीय हेतूमधून सुपार्‍या आणि टोळी युद्ध हे घडत गेले. सरते वर्ष पोलिसांना नक्कीच आव्हानात्मक गेले; मात्र यातून पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दिसत आहे. अनेक महत्त्वाचे आणि गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले.  नोटबंदीच्या काळात पोलिसांनीच प्लॅन करून नोटा हडप करण्याच्या प्रकारामुळे आणि कारागृहातील आरोपी पळवून लावण्यात पोलिसांचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांची चांगलीच नाचक्‍की झाली. 

शहरात रावेत, आकुर्डी परिसरातील महाकाली, रावण सेना आणि सोन्या काळभोर या टोळ्यांमध्ये धुमचक्री उडाली. यातून महाकाली टोळीच्या हनम्या शिंदेवर गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न केला गेला, तर याचा बदला म्हणून रावण सेनेच्या अनिकेत जाधवचा खून करण्यात आला. यावरूनच कारागृहात सोन्या काळभोरवर हल्ला करण्यात आला. याचबरोबर शहरात वर्चस्व दाखविण्यासाठी नव्याने उदयास आलेल्या टोळ्यांमध्ये भांडण, वाहनांची तोडफोड, राडेबाजी, दहशत हे प्रकार वारंवार घडले. यामधील अनेक गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला. 

शहरात खुनाच्या सुपारीचे प्रकरण चांगलेच गाजले. यामध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना पोलिसांनी पळवून लावल्याचे समोर आले. नोटबंदीच्या काळात एमआयडीसी पोलिसांनी स्वतःच कट रचून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रकार केला; मात्र हे उघडकीस आल्याने 32 लाख परत करावे लागले. या घटनांनी पोलिस दल हादरले. शहरातून दररोज किमान तीन वाहने चोरीस जात आहेत. जानेवारीपासून नोव्हेंबरअखेरपर्यंत 887 वाहने चोरीस गेल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे; मात्र त्यांपैकी फक्त 32 टक्के म्हणजे 281 वाहनांचा शोध लागला आहे. यांपैकी बहुतांश वाहने रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत मिळून आली आहेत. पोलिसांनी आरोपीला शोधून काढण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

जसजसा काळ बदलतो तसतशी गुन्ह्यांची पद्धतही बदलत जाते. सध्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.. गुन्हा जरी आपल्या शहरात घडला असेल, तरी आरोपी मात्र इतर राज्यांत असतात, यामुळे पोलिसांना कारवाई करताना अनेक अडचणी येतात. यामुळेच जवळपास सायबर क्राईमचे 70 टक्के गुन्हे उघडकीस येतच नाहीत. बँकेतून बोलत आहे, असे सांगून एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेऊन त्याद्वारे पैसे काढणे, एटीएम मशिनमध्ये गडबड करून पैसे काढणे यांसारखे अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. 

यंदाही या गुन्ह्याचा तपास ‘जैसे थे’

सात वर्षांपूर्वी दीपाली कसबे या चारवर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी  अत्याचार केले.  त्यानंतर खून करून मृतदेह टाकून दिला. चिंचवडच्या नागसेननगर झोपडपट्टीतील एका बालकावर भंगारवाल्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथे दृश्यम चित्रपट पाहून कुटुंबातील सदस्यांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीवर भाडेकरू गुंडांकडून खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड कुटुुंबातील व्यक्तीशी संबंधित होता. हल्ला करणार्‍याला पोलिसांनी अटक केली; मात्र मास्टरमाईंड भराडिया हा अद्यापही फरार आहे.  निगडीतील सेंट उर्सुला शाळेजवळ पोत्यात एक सांगाडा सापडला. त्या मृतदेहाची ओळख न पटल्याने या गुन्ह्यातील आरोपींचाही तपास लागलेला नाही.

स्वतंत्र आयुक्‍तालय नाहीच

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची मागणी जोरदार झाली. यामुळे हालचाली झाल्या. सध्या हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे आहे. चालू महिन्यात आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवला; मात्र 2017 मध्ये याला मंजुरी नाहीच.