Wed, Apr 24, 2019 07:45होमपेज › Pune › पहिली पेक्षा 7 वीच्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम

पहिली पेक्षा 7 वीच्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:04AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी  पहिलीच्या विद्यार्थ्यांपेक्षाही कमी रक्कम देण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर प्रशासनाने मात्र प्रिंटिंग मिस्टेकमुळे हा प्रकार घडला असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचा फटका पालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यावर्षी गणवेश व शालेय साहित्य पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता थेट निधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या साहित्याचा बाजारातील दर लक्षात घेऊन येणारी एकत्रित रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम देताना झालेल्या गडबडी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रक्कमेचा प्रशासनाकडून गोंधळ घालण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली गणवेशाची रक्कम भांडार विभागाकडून निश्‍चित करण्यात आली होती.

त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी याप्रमाणे 732 रुपये, दुसरीसाठी 756 रुपये, तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 782 रुपये, चौथीसाठी 804 रुपये असा चढत्या क्रमाने दर देण्यात आला आहे, त्यानुसार पुढे पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी फक्त 720 रुपये याप्रमाणे रकमेचे वाटप केले आहे. धक्कादायक म्हणजे हा दर पहिलीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे एका गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या हातात केवळ 360 रुपये पडणार आहेत. 

याबाबत भांडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांच्याकडे विचारणा केली असताना, त्यांनी प्रिटिंग मिस्टेकमुळे हा प्रकार घडला असे स्पष्टीकरण दिले. मात्र, ही चूक मराठी, इंग्रजी, उर्दु या माध्यमांबरोबर विद्यानिकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही घडली आहे. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना वाढीव रक्कम देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या शाळात शिकणार्‍या गोरगरिब विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

360 रुपयात गणवेश मिळतो का?

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गणवेशाच्या गुणव्वतेचा मुद्दा नेहमीच उपस्थित राहतो. मात्र, प्रशासनाकडून यावर्षी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एका गणवेशासाठी 360 रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. या तुटपुंज्या रक्कमेत विद्यार्थ्यांना चांगले गणवेश कसे मिळणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेने पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी 300 ते 400 रुपयापर्यंतची रक्कम दिली आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात एका गणवेशासाठी 700 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पालकांना पदरमोड करून गणवेश घ्यावे लागत आहेत. एकीकडे महापालिका अनावश्यक कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते; मात्र पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत भेदभाव केला जात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.