होमपेज › Pune › वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:25AM

बुकमार्क करा

शिक्रापूर/कोरेगाव भीमा ः वार्ताहर

शिक्रापूर-चाकण महामार्गावर पिंपळे जगताप (ता.  शिरूर) येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला.  

याबाबत वन विभाग व शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी (दि.  4) पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.  रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  प्रत्यक्षदर्शी कुणीही नाही.  रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेत हा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला.  

यानंतर पिंपळे जगतापच्या पोलिस पाटलांनी या प्रकाराची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली.  वन खात्याच्या अधिकार्‍यांना घटनास्थळावर बोलावून घेण्यात आले.  या अपघातात बिबट्याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाली होती व त्यातून रक्तस्त्राव होत होता. वनपाल बी. ए. गायकवाड, वनरक्षक सोनाली राठोड, एस. एन. शिंदे, क्षीरसागर, वनपाल क्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या सह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु अवसरी घाट परिसरात बिबट्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. 

या दुर्घटनेबाबत माहिती देताना वनपाल बबन गायकवाड यांनी सांगितले की, अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला होता.  हा बिबट्या आठ ते नऊ वर्षांचा होता.  तसेच या बिबट्याची पूर्ण वाढ झालेली होती.  या बिबट्याला अवसरी वन उद्यान येथे नेण्यात आले. त्याचे शवविच्छेदन करून दफन करण्यात आले. 

दगड मारले 

एकीकडे बिबट्या वेदनेने तडफडत असताना लोकांनी त्याला दगड मारून आणखी जखमी करण्याचा प्रयत्न केला; तर काही हौशी कार्यकर्त्यांनी बिबट्यासोबत व्हिडिओ व सेल्फी घेतल्याने अमानवीय वृत्ती दाखविल्याची चर्चा काही पशुप्रेमींनी व्यक्त केली.