Sun, Jul 21, 2019 10:05होमपेज › Pune › सांगवडे परिसरात बिबट्याचा वावर

सांगवडे परिसरात बिबट्याचा वावर

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:00AMशिरगाव : वार्ताहर 

सांगवडे येथे मंगळवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास गावातील काही तरुणांना बिबट्या आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, सांगवडेतील पानमंदवस्ती येथील अमोल राक्षे, गणेश राक्षे, शुभम वाघोले, अमर सोरटे, सोमनाथ राक्षे  हे सर्वजण रात्री अकराच्या सुमारास चारचाकी गाडीतून शेतातून घराकडे येताना बिबट्या रस्त्यावर बसलेला दिसला; परंतु गाडीच्या आवाजाने तो बाजूच्या उसाच्या शेतात पळाल्याचे या तरुणांनी सांगितले. 

या घटनेची माहिती कळताच वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी बुधवारी (दि. 12) सकाळी सांगवडेतील शेतात जाऊन बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले आणि पुढील तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले. संबंधित तरुणांनी रात्री गाडीतूनच काढलेल्या फोटोवरून तो बिबट्याच असल्याचे ताकवले म्हणाले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कासारसाई येथील काही शेतकर्‍यांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले होते.बिबट्या आजूबाजूच्या 10 ते 15 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात फिरत असल्याची माहिती ताकवले यांनी या वेळी दिली. या परिसरात ऊसशेती जास्त असल्याने या भागात त्याला लपून राहणे शक्य होते. 

या भागात पिंजरा लावण्यासाठी प्रधान वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने तशी परवानगी आम्ही मागितली असल्याचे ताकवले यांनी सांगितले; मात्र खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी संध्याकाळी एकटे बाहेर न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.