Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Pune › जिल्ह्यात बिबट्याचे हल्लासत्र सुरूच

जिल्ह्यात बिबट्याचे हल्लासत्र सुरूच

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 1:14AMपुणे : पुढारी वृत्त संकलन

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्लासत्र सुरूच आहे. परिणामी शेतकरी व नागरिक दहशतीत वावरत आहेत. शिरूर तालुक्यातील बेट भाग तसेच आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ भागात दररोज बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

पिंपरखेड परिसरात उपद्रव

शिरूर तालुक्यातील जांबुत, चांडोह, काठापूर खु., पिंपरखेड परिसरात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून, भय इथले संपत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाच दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक जर्शी गाय, दोन कालवड, शिंगरू, बोकड, शेळी, करडू हे पाळीव प्राणी ठार झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात आले असून, वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी  पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काठापूर खु. येथील शेतकरी गणेश चंद्रकांत लोंढे यांच्या गोठ्यातील गाभण गाईवर शुक्रवारी (दि. 22) रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने गोठ्यातून 50 फुटांवरील गवताच्या शेतात गाईला ओढत नेले. बिबट्याने गाईच्या मानेचा व मागच्या बाजूचा भाग फस्त केला. जर्शी गाय ठार झाल्याने शेतकरी लोंढे यांचे 40 हजारांचे नुकसान झाले.  चांडोह येथे शनिवारी (दि. 23) रात्री दीड वाजता बाळासाहेब सखाराम सालकर यांच्या गोठ्यातील शेळी व करडू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. 

महाळुंगे-साकोरेत दहशत 

आंबेगाव तालुक्याच्या उत्‍तर भागातील साकोरे, महाळुंगे, चास, कडेवाडी, साकोरे गाडेपटटी, आवटेमळा भागात बिबट्याने सुमारे 20 पाळीव जनावरांवर हल्‍ले केले आहेत. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश येत असल्याने   शेतकरी संतप्त झाले आहेत. 

शुक्रवारी (दि. 22) दतात्रय राघुजी पडवळ यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावला. राजेंद्र बाबुराव आवटे यांच्या गोठ्यातील शेळी बिबट्याने  बुधवारी (दि. 20) पहाटे फस्त केली, तर मोढवेमळा साकोरे येथील बाळासाहेब तुकाराम मोढवे यांची दुभती जर्सी गाईच्या पायाकडील भाग बिबट्याने तोडला. नुकतेच गाडेपट्टी येथील संदीप गणपत गाडे यांचे जर्सी गाईचे वासरू बिबट्याने फस्त केले होते.

सततच्या बिबट्याच्या वावराने शेतकरी हैराण झाले असून या भागात दहशत पसरली आहे. एकटा माणूस शेतात जाण्यासाठी धजावत नाही. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा चुकीच्या ठिकाणी लावला अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. मागील आठवड्यात पिंगळदारा महाळुंगे पडवळ येथे पिंजरा लावला असताना बिबट्या पिंजर्‍यात जावून पुन्हा बाहेर आला. बिबट्याने पिंजर्‍यातील सावजाला जखमी केले.