Sun, May 26, 2019 17:50होमपेज › Pune › ‘डीएसकें’वरील धडा वगळला

‘डीएसकें’वरील धडा वगळला

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:00AMपुणे ः प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. कॉम.च्या अभ्यासक्रमातून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जीवनावरील धडा वगळण्याचा निर्णय अखेर विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या जीवनावरील यशोगाथा या पुस्तकातील धडा शिकवावा की नाही, यावरून प्राध्यापक संभ्रमावस्थेत होते. विद्यापीठ प्रशासनाने अखेर परिपत्रक  काढत अभ्यासक्रमातून धडा वगळण्याचा निर्णय घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. कॉम.च्या प्रथम वर्ष आणि तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात डीएसकेंच्या जीवनावर आधिरित प्रकरणांचा समावेश होता. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात यशोगाथा या पुस्तकात, डीएसकेंचा संघर्ष, यश, प्रेरणादायी जीवनाचा प्रवास या प्रकरणाचा समावेश होता. तसेच तृतीय वर्ष अभ्यासक्रमातही डीएसकेंवर धडा होता. विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2013 मध्ये प्रकाशित झाली होती. आतापर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील प्रकरण शिकवले जात होते.

सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या डीएसकेंकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, असा प्रश्‍न प्राध्यापकांनी उपस्थित करत, धडा शिकवावा की नको, असा पप्रशश्‍न प्राध्यापकांना पडला होता. त्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे अटकेत असलेल्या डीएसकेवरींल धडा वगळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांनी जुलै महिन्यांत विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी (दि. 3 सप्टेंबर ) परिपत्रक काढत अभ्यासक्रमातील धडा वगळण्याचा आदेश दिला. दरम्यान, विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरावीक काळाने अद्ययावत होत नसल्याकारणाने ही अडचण निर्माण होत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.