Tue, Apr 23, 2019 22:44होमपेज › Pune › विरोधी पक्षनेताही आता वर्षभरासाठी

विरोधी पक्षनेताही आता वर्षभरासाठी

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:18AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ भाजप सत्ताधार्‍यांनी एक वर्षाचा केला आहे; तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्यांनाही वर्षभराचा कार्यकाळ असतो. त्याच पद्धतीने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दर वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाच्या वतीने इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. 

फेबु्रवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपने पालिका कारभार ताब्यात घेतला. भाजपचे 77 नगरसेवक व 5 अपक्ष नगरसेवक आणि स्वीकृत 3 नगरसेवक असे एकूण 85 नगरसेवक आहेत. प्रत्येक वर्षी स्थायी समिती सदस्यपद देऊन अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्याची परंपरा भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे पंचवार्षिकमध्ये तब्बल 55 नगरसेवकांना संधी मिळणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक, वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीसाठी एक वर्षाचा कालावधी असतो.  त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस दर वर्षी एका नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपद देणार आहे. त्या दृष्टीने पक्षाने नियोजन सुरू केले आहे.

सध्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल हे सक्षमपणे आपल्या पदाची धुरा सांभाळत नसल्याची त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांची तक्रार आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करीत त्या विरोधात रान पेटविण्यात ते कमी पडल्याचा आरोप होत आहे. त्यांनी सत्ताधार्‍यांसोबत सलगी केल्याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विरोधी पक्षनेतेपद बदण्याचा हालचालींना वेग आला आहे.

या पदासाठी माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, नाना काटे आदी अनेक जण इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे कोणाकडे विरोधी पक्षनेतेपद जाते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराना प्रखर विरोध करणार्‍या अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे. सध्या पक्षनेते अजित पवार हे अर्थसंकल्पी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यातून वेळ मिळताच ते या संदर्भातील निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या पदाचा वर्षभराचा कालखंड पूर्ण झाला आहे. पक्षनेत्यांनी राजीनामा मागितल्यास तो लगेच देईन. विरोधी पक्षनेतेपदी 5 वर्षांत 5 नगरसेवकांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण पूर्वीच ठरले आहे.