Mon, Aug 19, 2019 15:36होमपेज › Pune › पाणी वापरात आघाडी; संवर्धनात पिछाडी!

पाणी वापरात आघाडी; संवर्धनात पिछाडी!

Published On: Apr 22 2019 1:51AM | Last Updated: Apr 22 2019 1:51AM
पुणे : किरण जोशी 

पाणी वापराचे सर्व मापदंड गुंडाळून पाण्याचा बेसुमार वापर होणार्‍या पुण्यात जलसंवर्धनाबाबत उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील 15 हजार सोसायट्यांपैकी केवळ 3 हजार सोसायट्यांनीच पावसाचे पाणी साठविण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) पुढाकार घेतला आहे. रस्ते, नाल्यांच्या काँक्रिटीकरणामुळेही पावसाचे पाणी वाहून जातअसल्याने शहरातील  भूजल पातळीही खालावत आहे.

महानगरपालिकाने 2007 पासून  सर्व नव्या इमारतींवर रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प करणे बंधनकारक केले आहे. गेल्या दहा वर्षांत हजारो गृहप्रकल्प झाले; मात्र केवळ तीन हजार सोसायट्यांनीच या माध्यमातून पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये जुन्या सोसायट्यांनीही सहभाग घेतला आहे. पावसाचे पाणी साठविणे सहज शक्य असतानाही सोसायट्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रकल्प राबविण्याचे बंधन बांधकाम परवानगीमध्ये असले तरी अंमलबजावणी झाली का, याची पाहणीच होत नसल्याने या प्रकल्पांना गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

महापालिकेलाच नाही देणे-घेणे?

पुण्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 570 मि. मी. इतके आहे. हे प्रमाण लक्षात घेता प्रत्येकी एक हजार चौरस फूट क्षेत्रावर सुमारे 75 हजार लिटर पावसाचे पाणी पडते. या पाण्याचा संचय होऊन, त्याचा वापर झाल्यास टंचाईचे संकट दूर होऊ शकते. प्रकल्प राबविणार्‍या सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटधारकाला मालमत्ता करामध्ये 5 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, पाठपुरावा करण्यास महापालिका प्रशासान उदासीन आहे; तसेच पाण्याची झळ पोहोचत नसल्याने सोसायट्यांनाही याकडे दुर्लक्ष केले आहे.

शासकीय कार्यालयेही उदासीन-

शिवकालीन पाणी साठवण योजना, या राज्य शासनाच्या फेब्रुवारी 2002  मधील अध्यादेशानुसार सर्व शासकीय इमारतींवर रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, याचीही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेच्या 350 इमारतींपैकी केवळ 74 इमारतींवर हा प्रकल्प आहे. त्यातून सुमारे 5 कोटी लिटर पाण्याचा संचय होत आहे. मात्र, निधीअभावी इतर इमारतींमध्ये असा प्रकल्प होऊ शकलेला नाही.

भूजल पातळी आणखी घटली

पुण्याच्या गावठाणात पूर्वी 70 ते 80 फुटांवर बोअरला पाणी लागायचे. ही पातळी 100 ते 200 फुटांवर गेली आणि आता तर ती 500 फूट खोल गेली आहे. दिल्ली, बंगळुरू येथे भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. बंगळुरू येथे 1 हजार फुटांवर पातळी गेली आहे; तर दिल्लीत 2020 पर्यंत पाणी तळ गाठेल, अशी भीती आहे. एकीकडे पाण्याचा संचय कमी होत असताना उपसा वाढत असल्याने पुणे शहरासही भविष्यात हा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काँक्रिटीकरणाचाही अडथळा

गेल्या काही वर्षांत महापालिकेने काँक्रिटीकरणाचे धोरण अवलंबले आहे. नाले, रस्ते काँक्रिटचे करण्यात येत आहेत. पाणी जमिनीत झिरपत नसल्याने भूजल पातळी घटत असल्याचे निरीक्षण आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग खर्चीक आहे का?

इमारतींवर साठणारे पाणी जलवाहिनीमधून ड्रेनेजमध्ये सोडण्यात येते. हे पाणी नाल्यांतून नदीपात्रात मिसळून वाहून जाते. सोसायट्यांमध्ये बोअर घेऊन ड्रेनेजमध्ये जाणारे पाणी त्यात सोडल्यास या पाण्याचा वापर होऊ शकतो. यामुळे शुद्धीकरण केलेल्या पाण्याची बचत आणि सोसायट्यांना कर सवलतही मिळते.