Fri, Jul 10, 2020 19:12होमपेज › Pune › बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवा आणि बक्षिस मिळवा - नवा कायदा

बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवा आणि बक्षिस मिळवा - नवा कायदा

Last Updated: Nov 16 2019 11:25AM
पुणे : प्रतिनिधी 

देशात रस्ते स्वत:च्या मालकीचे असल्यासारखे वाहनचालक वागतात आणि वाहने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे देशात पार्किंगची समस्या भयंकर झाली आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांवर चारचाकी किंवा अन्य वाहने बेशिस्तपणे पार्क केल्याची माहिती छायाचित्राद्वारे कळवणार्‍या व्यक्‍तीला वाहनचालकाला करण्यात आलेल्या दंडाच्या 20 टक्के रक्‍कम बक्षीस म्हणून देण्याचा विचार आहे. तसा कायदाच येत्या काळात करण्यात येणार आहे. हा कायदा येत्या काही दिवसात अंमलात आणण्यात येईल, असे सुतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.

सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित ’लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते. युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, देशात पार्किंगची समस्या भयंकर झाली असून, पार्किंगला जागाच उपलब्ध नाही. दिल्‍लीत माझ्या कार्यालयाच्या बाहेर पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नव्हती. ही समस्या सोडविण्यासाठी एनएचआयडीसीच्या ’ईझी पार्क’ ही ऑटोमॅटिक कार पार्किंग इमारत उभारण्यात आली. आता एनएचआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये अशा 50 पेक्षा अधिक इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचा व्यावसायिक वापरही होईल. त्याचबरोबर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये बस पोर्ट उभारण्यात येणार आहे. या बसपोर्टला सर्व दळणवळणाच्या सोयींनी जोडण्यात येणार आहे. परिवहन विभागाने नुकताच एक सर्व्हे केला असून, त्याद्वारे राज्य सरकारांच्या मदतीने देशात सुमारे दोन हजार बस पोर्ट सुरू करता येणार आहे. या बसपोर्टची निर्मिती बीओटी तत्वावर करण्यात येणार आहे. या बसपोर्टच्या जागेचा वापर बँका, कॅफेटेरिया, लॉज, दुकाने अशा व्यावसायिक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.